कृषी

कर्जमाफीतील शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात आलेली व्याजाची रक्कम परत करा-क्रांतिसेनेची मागणी; किशोर तांगडेंना पाठींबा

ढोरकीन : पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात आलेल्या कर्जावरील व्याज रक्कम परत करुन औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या निर्णयाची केलेल्या थट्टे बाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत संपूर्ण संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच याप्रकरणी किशोर तांगडे यांनी सादर केलेल्या तक्रारीस क्रांतिसेना जाहीर पाठिंबा देत असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
शासनाने शेतक-यांची कर्ज माफी केलेली असताना आणि ज्यांच्या खात्यात कर्ज रक्कम वर्ग झाली नाही त्यांची हमी दिलेली असताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकने सर्रास व्याज वसुली केली आहे. या कठीण काळात संपूर्ण राज्य शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतांना औरंगाबाद जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करून वसुली केली आहे. ती व्याजासह परत करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाने दोन वेळा आदेशीत करूनही औरंगाबाद जिल्हा बँकने स्वतंत्र ठराव घेतला असे दाखवून, संबधीत खात्याने कोणतीही परवानगी दिली नसताना शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले, त्यासाठी ठराव घेतला. या शेतकरी विरोधी आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या संचालक मंडळावर आणि अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी व्याज वसुली थांबविण्यासाठी व व्याजाची रक्कम परत करण्यासाठी जिल्हा बँक, जिल्हा निबंधक, राज्य निबंधक तथा संबंधीत कार्यालयात वारंवार पाठपुरावा करून संपुर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवासाठी जो लढा उभारला आहे, त्यांना जाहीर पाठिंबा देवून नैतिक पाठबळ देत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. याप्रकरणी तांगडे यांना संरक्षण मिळावे आणि हा मुद्दा निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी क्रांतिसेनेच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर पक्ष प्रमुख संतोष तांबे, राज्याचे सरचिटणीस नितीन देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार, तालुका उपाध्यक्ष गणेश औटे, शहराध्यक्ष संदीप तांबे, शहर प्रसिद्धीप्रमुख निलेश देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button