ठळक बातम्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या कार्यालयावर संतप्त विद्यार्थ्यांकडून दगडफेक
राहुरी शहर | अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या कार्यालयावर रविवार दि.३१ जुलै रोजी पहाटे १ ते ३ च्या दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली असून प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढुस यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली असून घटनेची अधिक माहिती अशी की, कृषि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठात देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना ७० हजार रुपये फी भरावी लागते. या विद्यापीठात एकूण १६८ प्रवेश मर्यादा आहे. तथापि या विद्यापीठाच्या हॉस्टेल मध्ये जवळपास ५०० विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहात असून त्यांना कुठली ही हॉस्टेल किंवा मेस फी नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली.
अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेल पासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत ५०० विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला. तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस यांनी केली असून क्रांतीनामा न्युज पोर्टल टीमशी बोलताना ढुस म्हणाले की, मला पहाटे ३.५५ वाजता काही विद्यार्थ्यांनी फोन करून घडलेली घटना कथन करून आम्हाला वाचवा अशी विनंती केल्यावरून मी पहाटे विद्यापीठात येऊन पाहिले असता काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षक गोरक्षनाथ शेटे यांच्या केबिन मध्ये आसरा घेतला होता. हे विद्यार्थी खूप घाबरलेले होते. आम्हाला वाचवा म्हणत होते, आमचा मर्डर झाला तर त्याला जबाबदार कोण असे विचारीत होते. आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरा सारखे लपून बसावे लागते अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.
तसेच काही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून घरी निघून जाण्याची भाषा करीत होती. विद्यापीठात या ५०० विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या चिरीमिरीसाठी त्यांना संभाळणेत विद्यापीठाचा वेळ वाया जात असून विद्यापीठाचा संशोधन हा मुख्य हेतू त्यामुळे बाजूला पडला असल्याची खंतही या विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली असल्याने या सर्व घटनेची मुख्यमंत्री महोदयांनी उच्यस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी ढुस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ढुस यांनी काही प्रश्न उपस्थित केले की, या ५०० अनधिकृत विद्यार्थ्यांना होस्टेल मध्ये राहू देण्यासाठी म्हणून टेबल खालून मोठा व्यवहार केला जात असावा असा संशय असून त्याकामी मोठे रॅकेट येथे कार्यरत असावे. म्हणूनच रात्री घडलेली दगडफेकीची घटना दडपण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होताना दिसत आहेत. वार्षिक ७० हजार फी गुणिले ५०० विद्यार्थी ही वार्षिक उलाढाल होते किंवा कसे याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास भविष्यात या विद्यापीठात पुन्हा अश्या घटना होणार नाहीत किंवा या अनधिकृत विद्यार्थ्यांकडून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे ढुस म्हणाले.