श्रीगोंदा/सुभाष दरेकर : नोव्हेंबर महिना संपत आला तरी कुकडी सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे पाणी असूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय. विहिरीत पाणी आहे परंतु वीज नाही. त्यातच काही शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची उभी पिके सूकून चालली आहेत. याकडे तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने तातडीने पाणी सोडा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल,असा इशारा राजेंद्र म्हस्के यांनी दिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही. सध्या श्रीगोंदा तालुका हा वाऱ्यावर सोडला गेला आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे सरकार आहे, त्यामुळे ते गप आहेत. जनतेच्या प्रश्नाकडे कोणाचे लक्ष नाही सगळ्याच पक्षांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे कारण त्यांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसे एवढेच गणित माहिती आहे, असा आरोपही म्हस्के यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हस्के म्हणाले की, पैशावर सर्व काही मिळते हा भ्रम नेते मंडळीना झाला आहे. जनतेने जागृत होऊन तालुक्यातल्या प्रश्नाांसाठी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे. तरच आपल्याला कुकडीच्या पाण्याला न्याय मिळू शकतो. नाहीतर मागच्या वर्षी सारखं धरणात पाणी असून पाणी मिळाले नाही. पाणी आलं की पाण्याचे श्रेय लाटणारे भरपूर आहेत. परंतु जबाबदारी घेणारे कोणीच नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य कष्टकरी अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याला न्याय देण्याची भूमिका राज्यकर्त्यांमध्ये राहिलेली दिसतं नाही. यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणी आहे. परंतु धरणात पाणी असून सुद्धा त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळत नाही हे दुर्दैव आहे. चार दिवसाच्या आत सल्लागार समितीची बैठक बोलावून तातडीने पाणी सोडले नाही तर रस्त्यावर उतरावे लागणार आहे.
तालुक्यातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी फॉर्म भरून पाणी घ्यावे. पाणी मागणीचे फॉर्म भरणे हे अत्यंत गरजेचे आहे. फॉर्म न भरल्यामुळे अधिकारी पाण्याची मागणी झाली नाही आणि त्यामुळे आम्हाला नियोजन करता आले नाही. असे कारणे देतात. सगळ्या शेतकऱ्यांनी जागृत राहून आपल्या हक्काच्या पाण्याची अधिकृत मागणी करणं गरजेचा आहे नाहीतर जे पाणी मिळतंय ते सुद्धा गमवावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची अधिकृत मागणी करून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन म्हस्के यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांच्या पोरांनी कुकडीच्या पाण्यासंदर्भात सतर्क होण्याची गरज आहे व हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता आहे. पाणी फाॅर्म भरल्याशिवाय कोणीही पाणी घेऊ नये. पाण्याची बोगसगिरी थांबून तालुक्याला चांगलं वळण लागावे म्हणून याकामी अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा येथे लाभधारकांची बैठक बोलवावी, अशी मागणीही पाटपाणी कृती समितीचे राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे.