कृषी
हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा सोहळा…!
संगमनेर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. सध्या हिवाळा सुरु असूनही पाऊस सूरु असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. अगोदरच कोरोनाचे संकट त्यात आणखी महागाईची भर व आता निसर्गाच्या लहरीपणामुळे अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याची अवस्था आगीतून उठून फोफोट्यात पडल्यासारखी झाली आहे.
अवेळी पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील काढणीसाठी आलेला लाल कांदा पावसात भिजल्यामुळे खराब झाला असून मार्केटमध्ये या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच लाल कांदा व इतर भाजीपाला पिके यावर धुक्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पिकांना योग्य हवामान नसल्याने महागड्या औषधांची फवारणी करावी लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून सरासरी उत्पन्नातही घट आली आहे. त्यामुळे नफा तर सोडाच पण पिकावर केलेला खर्चही निघत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिकं वाचविण्याचे मोठं आव्हान बळीराजापुढे निर्माण झाले आहे.
अगोदर कोरोना संकट आता महागाई, दुधदराची घसरगुंडी व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा आर्थिक व मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचला असून सरकारने आत्मचिंतन करून योग्य ती मदत करावी._बाळासाहेब भोरअ. भा. क्रांतिसेना, संगमनेर