कृषी
		
	
	
शेतकरीहिताला प्राधान्य देणाऱ्या जीतशार कंपनीस पूर्ण सहकार्य करणार : तहसीलदार प्रशांत पाटील
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : ग्रामीण जीवन शेतीकेंद्रित आहे, जीतशार प्रोड्युसर कंपनी बायो इंधननिर्मिती करणार आहे, अशा शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या प्रकल्पास पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिले. 
   श्रीरामपूर तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत पाटील यांना जीतशार कंपनीतर्फे बायो इंधननिर्मिती प्रकल्पाचे निवेदन, माहिती पुस्तिका कंपनी संस्थापक, अध्यक्ष रंजीत दातीर यांनी       दिली. तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आदर्श कार्याबद्दल सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी “संत संस्कृतीची ज्योत “कवितासंग्रह देऊन तहसीलदार पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून जीतशार कंपनी चर्चेत भाग घेतला. याप्रसंगी प्रा. डॉ. बबनराव आदिक,नायगावचे  सरपंच डॉ.राणा राशीनकर, राजेंद्र येळवंडे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब पटारे, रोहिदास लांडे आदी उपस्थित होते. रंजीत दातीर यांनी श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे उभारण्यात येत असलेल्या जीतशार प्रोड्युसर कंपनी प्रा.लि, शकुंतला क्लिनीफ्युएल प्रा.ली. श्रीरामपूरतर्फे राबविण्यात येत असलेल्या बायो इंधननिर्मिती आणि त्यातून  शेतकरी कल्याणाचे फायदे सांगितले. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ‘भारत महासत्ता ‘ विचारांचा  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संदर्भ देत गावविकास आणि आरोग्यशील जीवन याविषयीं चर्चा केली. डॉ. बबनराव आदिक यांनी आपली शेती आणि आपले अर्थकारण याविषयीं कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या भावी प्रकल्पाची माहिती दिली. सरपंच डॉ.राणा राशिनकर यांनी आभार मानले.
 
				 
  

