कृषी
विद्युत महावितरण कंपनीचा शेतकऱ्यांना शाॕक; कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित
विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील ढोरकीन, लोहगाव या धरण फुगवटा क्षेत्रातील बारा गावातील जवळपास बाराशे ते दिडहजार शेतकऱ्यांचा कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. विजबील वसुलीसाठी महावितरणने ही मोठी धडक कार्यवाही केली आहे.
कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोहगाव सबस्टेशन गाठुण येथिल सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांची भेट घेऊन आतिवृष्टी मुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे थोडीफार रक्कम सध्या भरणा करुण घ्यावी व उर्वरीत रक्कम माल माथ्यावर भरणार असल्याची हमी परीसरातील शेतकरी रामदास थोटे, कल्याण ढोकळे, सोपान कनसे, रविंद्र थोटे, राहुल उघडे, भागचंद थोरात, बद्री ढोकळे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा पुर्ववत चालु करण्याची विनंती केली.
मात्र जवळ असलेली तुटपुंजी रक्कम आणि थकीत विद्युत बिल यामध्ये मोठी तफावत येत आहे. यामुळे आधिच अतिवृष्टीने कंगाल झालेला शेतकरी आता विद्युत महावितरणच्या झटक्याने पुर्ता हतबल झाल्याचे वास्तव चित्र ढोरकीन, लोहगाव, ढाकेफळ, बिडकीन, शिवणी, टाकळी, शेवता, तारुपिपंळवाडी, वाघुंडी, मुलानीवाडगाव, लामगव्हाण, मावसगव्हाण, विजयपुर, तोंडोळी आदी गावात दिसुन येत आहे.
आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी घायाळ झाला आहे. त्यात शेतकऱ्यांचा विज प्रवाह खंडित करुन महावितरणने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी विज बिल भरण्याच्या स्थितीत नसताना ही केलेली सक्ती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. यावर शासनाने त्वरित भुमिका घेवून महावितरणला विज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, नसता शेतकरी वर्गातून उद्रेक होईल.
– गणेश काळे, शेतकरी शिवणी