साहित्य व संस्कृती
संतकवी एकनाथ डांगे पाटील यांच्या “भक्तीदीप” कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : संतकवी एकनाथ हरिभाऊ डांगेपाटील यांच्या “भक्तीदीप” या कविता संग्रहाच्या मुद्रणपूर्व प्रतीचे प्रकाशन श्रीरामपूर येथील श्रीराम मंदिरामध्ये वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये आणि श्रीराम मंदिरातील पुजारी, विश्वहिंदू परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य कुणाल करांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. शिवाजी काळे, पत्रकार बाबासाहेब चेडे, कवयत्री संगीता फासाटे, कु. सुकन्या काळे, सूरडकर आदिंसह भक्तगण उपस्थित होते.
संतकवी एकनाथ डांगे पाटील यांनी प्रथमतः भगवान श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांचे पूजन करुन कवितासंग्रह श्रीरामचरणी ठेवला, देवपूजन केले. उपस्थित भक्तगणांचे स्वागत करुन प्रकाशनपूर्व “भक्तीदीप” कवितासंग्रहाचे आशयकाव्यत्व विशद केले. काही कवितांचे वाचन केले. उपस्थितांचे सत्कार केले.
कुणाल करांडे यांनी “भक्तिदीप ” हा कवितासंग्रह नक्कीच सर्वांना प्रिय होईल, त्या पुस्तकाचे पुढील प्रकाशन श्रीराम मंदिरातच होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी कवितासंग्रहाचे प्रकाशन पवित्र पावन अशा कार्तिकी एकादशीला झाले आणि श्रीरामपूरचे दैवत असलेल्या श्रीराम मंदिरात पुस्तक प्रकाशनासाठी आशीर्वाद घेतला. त्यामुळे हा ” भक्तिदीप ” घराघरात ज्ञानदीप आणि धर्मगीत जागवेल, उजळेल, सर्वमुखी ह्या कविता होतील असा आशावाद व्यक्त केला.
संतकवी एकनाथ डांगे यांच्या अगोदरच्या “भक्तीगन्ध ” कवितासंग्रहाने वाचकांना हाच आनंद दिलेला आहे. त्यापेक्षा अधिक आनंद “भक्तिदीप” ने वाढणार असल्याचे सांगून श्री डांगे यांच्या साहित्य, वृत्तपत्र, पत्रकारिता कार्याचे कौतुक केले. डॉ. शिवाजी काळे यांनी हा कवितासंग्रह मनामनात भक्ती आणि समाधान निर्माण करील असे सांगितले. कवयित्री संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले तर बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.