अहमदनगर

चिंचोलीत आढळले बिबट्याचे बछडे, परिसरात दहशत

राहुरी / बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील चिंचोली येथे शेतात मका पिकाची सोंगणी करताना बिबट्याचे एक नवजात बछडे आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. राहुरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मिळालेल्या ठिकाणी पुन्हा सुरक्षितपणे हे बछडे ठेवले असून परिसरातील ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चिंचोली शिवारात देवळाली प्रवरा रस्त्यालगत प्रकाश जालिंदर लाटे यांची वस्ती असून त्यांच्या गट नंबर १३६ या शेतात मका पिकाची काढणी करण्याचे काम सुरू होते. कापणी करत असताना महिलांना लहान पिलू ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहता मांजराच्या पिलासारखे एक नुकतेच जन्माला आलेले पिलु आढळून आले. हा प्रकार शेतमालक प्रकाश लाटे यांना सांगितला. त्यांनी सदरचे पिलु सुरक्षितपणे उचलून घरी आणले. मात्र त्या पिलाचा आवाज मांजराच्या ओरडण्यापेक्षा वेगळा आल्याने त्यांनी वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाचे कर्मचारी मुश्ताक पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता सदरचे पिलु बिबट्याचे असून नुकताच त्याचा जन्म झाल्याचे सांगत सदर पिलाला परत आहे त्या ठिकाणी ठेवत सदरची बिबट्या मादी परत पिलाचा शोध घेऊन परत नेणार असल्याचे सांगितले आहे. सदर ठिकाणी आवश्यकता भासल्यास पिंजरा लावला जाइल असेही ते म्हणाले.
या परिसरात बिबट्याचे बऱ्याच दिवसापासून वास्तव्य असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या परिसरातून पाळीव कुत्र्यांबरोबर शेळ्या, बोकड गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. चारा व पाण्याची व्यवस्था याठिकाणी असल्याने बिबट्या याच परिसरात ठाण मांडून आहे. मादी बिबट्याबरोबर नरबिबट्याचाही संचार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सोबत हे नवजात बछडे सापडल्याने घटनेला पुष्टी मिळाल्याने वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button