अहिल्यानगर
जनसामान्यांच्या सामाजिक प्रश्नांशी लोकशाही विचार मंच बांधील – सोमनाथ शिंदे
राहुरी / बाळकृष्ण भोसले – तळागाळातील जनसामान्यांच्या सामाजिक उत्थानासाठी व त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी लोकशाही विचार मंच नेहमीच अग्रेसर राहिला असून समाजातील शेवटचा उपेक्षित, वंचित घटकांना समाजप्रवाहात आणण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन या मंचाचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी केले.
राहुरी येथे पंचायत समितीचे मा. उपसभापती प्रदीप पवार यांच्या कार्यालयात श्री शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, प्रसंगी ते बोलत होते. आज राज्यात बहुतेक ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन गरजा बरोबरच त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना तसेच विविध शासकीय कामांसाठी अनेकविध अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यायाने त्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही अथवा त्यांची कामे रखडतात. त्यासाठी लोकशाही विचार मंचने पुढाकार घेत एक सामाजिक बांधिलकी जपत अशा घटकांना आधार देण्याचे काम हाती घेतले असून त्याचा फायदा हळूहळू का होईना त्यांच्या पर्यंत मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाही विचार मंचाचे असे सकारार्थी परिणामांचे श्रेय असल्याचे सांगत हि लोकचळवळ व्हावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे, अविनाश जाधव, तुषार दळवी, अक्षय कलंके मनोज शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य आसिफ पठाण, लोकशाही विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र कडू आदींसह मान्यवर उपस्थित होते.