प्रासंगिक

लढाई लालपरीच्या अस्तित्वाची?

राज्यात गेली कित्येक दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. सर्वच क्षेत्राला त्याचा फटका बसला असून एस टी महामंडळाचीही यातून सुटका होऊ शकली नाही. आता सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र कर्मचारी संपावर आहेत. खरे तर राज्यातील 99 % नागरिकांनी लालपरीने नक्कीच प्रवास केलेला असावा. विद्यार्थी, नोकरदार, कामगार, अबालवृद्ध सर्वांची लालपरीशी नाळ जोडलेली आहे. परंतु अगोदर कोरोना संकट व आता कर्मचारी संपामुळे लालपरीच्या जणू काही अस्तित्वाचीच लढाई सुरु आहे कि काय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार तसा इतरांच्या तुलनेत नक्कीच कमी आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे एस टी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागलीय. तशी ही मागणी काही चुकीची नाही. अति दुर्गम भागात खाचखळगे, दिवस वा रात्रीची पर्वा न करता गर्दीतून वाट काढत चालक प्रवाशांना सेवा देत असतो. तसेच दररोज शेकडो प्रवाशांना तोंड देत सुट्ट्या पैशांची जुळवा जुळव करताना त्याचीही तारेवरची कसरत सर्वांनी बघितली असेलच… शिवाय अति दुर्गम भागात मुक्कामी पण राहावे लागते. इतकं करूनही तुटपंज्या वेतनावर काम करावं लागतं ही मोठी शोकांतिका आहे. शिवाय दसरा असो वा दिवाळी त्यांना कामावर हजर राहावंच लागतं.
राज्यात अलीकडच्या काळात रस्त्यांचं खूप मोठ जाळं उभं राहिलं आहे. तेही सुसज्ज त्यावरून अनेक वाहनं दररोज धावतात. मात्र लालपरी धावल्याशिवाय या रस्त्यांना शोभा येत नाही. राज्यात कुठेही आंदोलने, दंगल झाली तर लालपरीच्या काचांनी दगडांचे घाव सोसले तर कधी तीला अग्नीत आपलं समर्पण करावं लागलं. अनेक अपघातही घडले असतील मात्र आजही ती तेवढ्याच दिमाखात उभी आहे. पूर्वी रस्त्यांना असलेल्या खड्यांमुळे साध्या बसच्या खुळखूळ करणाऱ्या काचांचा आवाज आजही कानात गुंजतो आहे. आता सुसज्य वाहनं आली परंतु तो जिव्हाळा आता राहिला नाही. असो, यावर लवकरच तोडगा निघेल व लालपरी तेवढ्याच डौलात पुन्हा रस्त्यावर धावेल अशी माफक अपेक्षा…!
 
बाळासाहेब भोर 
क्रांतीसेना, संगमनेर

Related Articles

Back to top button