गुन्हे वार्ता
कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संजय भोसले
राहुरी /बाळकृष्ण भोसले : अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नसून ती ब्रिटिशांनी भारताला दिलेली भिक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळालेले आहे अशा स्वरूपाचे वादग्रस्त विधान करून भारतासाठी शहीद झालेल्या तमाम क्रांतिकारकांचा आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा हा अपमान आहे. या घटनेचा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
याबाबत कोल्हार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील शिरसाठ यांनी निवेदनात म्हटले आहे की ही घटना अतिशय निंदनीय आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. तीला शासनाने दिलेला सन्मान त्वरित परत घेण्यात यावा. प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे समन्वयक संजय भोसले यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील शिरसाट, काँग्रेसचे उपाध्यक्ष रखमा शिरसागर, अल्फोंस भोसले, सुधीर भोसले, भागवत शिरसाठ, सतीश शिरसाठ, मच्छिंद्र शिरसाठ, संजय शिरसाठ सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.