अहिल्यानगर
टाळे ठोको आंदोलन स्थगित – राजेंद्र म्हस्के
श्रीगोंदा/सुभाष दरेकर : स्वतंत्र क्रांतीकारी पक्ष व श्रीगोंदा पाटपाणी कृती समिती यांच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात सोमवार दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात येणारे टाळे-ठोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे.
या संदर्भात काल संध्याकाळी ५.०० वा. श्रीगोंदा तहसीलदार कुलथे यांनी प्रमुख कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंपलकर, महावितरण विभागाचे चौगुले, कुकडी पाटबंधारे विभागाचे माने आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राजेंद्र म्हस्के यांनी तहसीलदार कुलथे व संबंधित अधिकाऱ्यांशी सर्व प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. तालुक्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा देखील करण्यात येईल. त्यासाठी थोडा कालावधी द्यावा व आपण ठेवलेले आंदोलनापासून परावृत्त होउन प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती तहसीलदार व सर्व अधिकाऱ्यांनी केली.
यावेळी तहसीलदार श्री. कुलथे म्हणाले की, प्रश्न व मागण्या आपल्या स्तरावर मार्गी लागू शकतात. त्या आपण तातडीने लावू व जे प्रश्न व मागण्या वरिष्ठ स्तरावर मार्गी लागतील, त्यासाठी आपण लवकरात लवकर पाठपुरावा करू. माझ्याशी निगडीत असलेल्या लिंपणगाव येथील देवस्थान जमिनीतील मुरूम उपसा संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल व कुकडी प्रकल्प डि. वाय १२, १३, १४ साठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मोबदला यासंदर्भात माहिती घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न ही मार्गी लावण्यात येईल.
महावितरणचे श्री.चौगुले म्हणाले की, कृषी पंपाचे विज बिल माफी हा प्रश्न वरिष्ठ स्तरावरचा असल्याने निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहे. उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी काष्टी, लिंपणगाव भागात तशी व्यवस्था केली आहे. इतर भागात देखील लवकरात लवकर व्यवस्था करून उच्च दाबाने वीज पुरवठा करण्यात येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. अपंलकर म्हणाले की, नवीन कामांसाठी निधी शिल्लक नसून आपण केलेली मागणी वरिष्ठांकडे कळवलेली आहे. तालुक्यातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. काही कामांचे टेंडर झाले आहेत. ती कामे देखील लवकरात लवकर चालू करण्यात येईल.
कुकडी पाटबंधारे विभागाचे श्री.माने म्हणाले की, कुकडीच्या पाण्याच्या नियोजनाकरिता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन दृष्टीने जलसंपदा मंत्री यांच्या कार्यालयाशी बैठकीसाठी दिनांक व वेळ मिळणेबाबत विनंती केली आहे. चालू वर्षासाठी कुकडीचे चार आवर्तने मिळावी आपल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील प्रश्नांसंदर्भात दि. १५ नोव्हेंबर रोजी टाळे ठोक आंदोलन ठेवले होते. त्या सर्व प्रश्नांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी थोडा कालावधी मागितला आहे व आंदोलनापासून परावृत्त होण्याची विनंती केली आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनही दिले असल्याने टाळे- ठोको आंदोलन स्थगित करून पंधरा दिवसांनंतर आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले आहे.