कृषी

डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी परिसंवादात सहभागी होवून लाभ घ्यावा- कृषिमंत्री ना. दादाजी भुसे

राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगावात डाळिंब परिसंवादाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : कृषि विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगांव तालुक्यातील सातमाने येथील डाळिंब उत्पादक शेतकरी रविंद्र पवार यांच्या शेतशिवारात रविवार दि. 14 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यासह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी डाळिंब परिसंवादामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, नांदगाव, चांदवड, सिन्नर तालुक्यातील जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली जाते. डाळिंबासारखे नगदी पीक नसल्यामुळे शेतकरी बांधव स्वत: तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत डाळिंबाची लागवड करीत आहेत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्यामुळे डाळिंब लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढता असला तरी डाळिंब पिकावर गेल्या पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणात मर व तेलकट डाग या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी कृषि विभाग, कृषि विद्यापीठ व कृषि संशोधन केंद्रामार्फत प्राप्त होणारे संदेश गावातील वार्ताफलकावर तसेच समाज माध्यमातून तयार करण्यात आलेल्या समुहाच्या माध्यमातून शेतकर्यांना उपाय योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.
डाळिंब उत्पादक शेतकरी, डाळिंब संघ, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या समवेत शेतकर्यांचा सुसंवाद साधण्याच्या उद्देशाने मालेगाव तालुक्यातील सातमाने या ठिकाणी या डाळिंब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामुळे चांगल्या गुणवत्तेचे निर्यातक्षम डाळिंब उत्पादीत करणार्या शेतकर्यांना नक्कीच लाभ होईल.
या डाळिंब परिसंवाद कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यासह सोलापूर, सांगली, पुणे, धुळे व अहमदनगर आदि जिल्ह्यातून डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार असून या परिसंवादात महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, शास्त्रज्ञ डॉ.विनय सुपे, डाळिंब तज्ञ श्री. बाबासाहेब गोरे यांच्यासह कृषि विभागातील वरिष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या डाळिंब परिसंवादासाठी डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

Related Articles

Back to top button