कृषी
कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांची डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान केंद्राला भेट
राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथील डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान केंद्र येथील संशोधन केंद्राला राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली.
यावेळी ना. भुसे यांनी केंद्राची पाहणी केली. केंद्रामधील सुविधा तसेच संशोधन रोपवाटीका व इतर बाबींचा त्यांनी आढावा घेतला तसेच शेतकर्यांच्या मार्गदर्शनासाठी व सोयीसाठी डाळिंबावरील संशोधन वाढविण्याची गरज व्यक्त केली. माती, पाणी परिक्षण व डाळिंबाचे खत व्यवस्थापन याविषयी जास्तीत जास्त शेतकर्यांना मार्गदर्शन होण्यासाठी माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा निर्माण करावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डाळिंबामधील रोग कीड व्यवस्थापन तसेच तेल्या रोगाचे व मर रोगाचे व्यवस्थापन यावर भर देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ शिंदे व डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन हिरे, किटकशास्त्रज्ञ डॉ. एस.डी. पाटील तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी विनोद जाधव व पप्पू बच्छाव उपस्थित होते.