शिक्षणवारी ज्ञान पंढरी
चिमुकल्यांची भरली शाळा …
बाळकृष्ण भोसले/ राहुरी – कोरोना महामारीच्या प्रदिर्घ दोन वर्षाची विश्रांती तसेच दिपावलीच्या अल्पकालीन सुट्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळा गुरुवारपासून पुन्हा पुर्ववत सुरू झाल्याने बऱ्याच दिवसापासून कोमजून गेलेल्या शाळा चिमुकल्यांच्या गलबलाटाने अक्षरशः फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
चिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेत फेरफटका मारताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील फुललेला आनंद पाहताना निश्चितच मन भरुन आले. अबोल झालेल्या शाळेच्या भिंती या चिमुकल्यांच्या कोलाहलाने सजीव झाल्याची अनूभुती अनुभवण्यास मिळाली. या शाळेचा स्वच्छ नि सुंदर परिसर सोबत मनमोहक हिरवळ जोडीला हुंदडण्यासाठी झोके व घसरगुंड्या या सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. तालुक्यात आदर्श असलेल्या या शाळेत शिक्षकांनीही गुणवत्ता व कोरोना प्रोटोकॉल साठी कंबर कसली असून शाळेच्या गेटवरच मुलांचे तापमापकाद्वारे तपासणी करुन हात निर्जंतुकीकरण करण्यात शिक्षक गुंतले होते. साईसंस्थानने चिमुकल्यांना बसण्यासाठी दिलेली बाके निर्जंतुक करण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरु होती तर चेहऱ्यावरची मुखपट्टी मुलांनी व्यवस्थित घातली की नाही याचीही तपासणी होत होती. दुसरीकडे मध्यान्ह भोजनाची तयारी सुरू झाली होती. अशा प्रसन्न वातावरणात शाळा भरली असून पालकांचा आपल्या पाल्याल्या शाळेत आणून सोडण्यासाठीचा ओढा खचितच लक्षणीय वाटला. मुले शिकावित सुसंस्कारित व्हावीत हाच उद्देश शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून सद्यस्थितीत पहावयास मिळतो. शाळाबाह्य मुलांची संख्याही अगदीच नगण्य असल्याचे यावेळी जाणवले.
एकुणच चिमुकल्यांच्या सुरक्षितता व गुणवत्तेसाठी शाळेचा प्रत्येक घटक मनापासून कार्यरत असल्याचे पाहता सर्वच शाळेतून असे प्रयत्न झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळा उच्चतम गुणवत्ता प्राप्त होतील यात तिळमात्रही शंका नाही. चिंचोलीच्या शाळेतील शिक्षक सर्वश्री मुख्याध्यापिका श्रीमती मिनाक्षी पाळंदे, सजन सर, कडाळे मॅडम, पारेकर सर, भाकरे मॅडम, कोरुलकर मॅडम, बोकंद सर, बलसाने मॅडम घेत असलेल्या अथक प्रयत्नांचे गाव व परिसरातून कौतुक होत आहे.