ठळक बातम्या
सुरत- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार; जमीन अधिग्रहण सुचना प्रसिध्द
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : बहुचर्चित सुरत- हैदराबाद महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टिकोनातून जमीन अधिग्रहण सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील 19 गावांचा त्यामध्ये समावेश आहे. सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी आधिसुचना नोटीस बोर्ड, गाव चावडीवर प्रसिद्ध करण्याचे नियोजन केले आहे.
सुरत- हैदराबाद महामार्गासाठी राहुरी तालुक्यातील 19 गावांचे भुसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी धानोरे, सोनगाव, माळेवाडी -डुकरेवाडी, कानडगाव, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर, कनगर खुर्द, कनगर बुद्रुक, चिंचविहिरे, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, डिग्रस, सडे, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी आदी गावांचा यामध्ये समावेश आहे.
एकोणावीस गावांचे भूसंपादन कार्यवाही सुरू आहे. केंद्र शासनाने राजपत्रात अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे. या संदर्भामध्ये सर्वे ही उपग्रहाद्वारे करण्यात आला आहे. लवकरच जमिनी ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्या दृष्टीकोनातून शासकीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. राहुरी तालुक्यातील 19 गावातील हजारो एकर जमीन या रस्त्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष एक्सप्रेस ग्रीनफिल्ड याकडे वेधले आहे.
या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी ह्या द्याव्या लागणार आहेत. जमिनी दिल्यामुळे ते भूमिहीन होणार आहेत. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुळा धरण, मुळा सूतगिरणी, राहुरी साखर कारखाना आदींसाठी वेळोवेळी आपल्या जमिनी देऊन त्याग केला आहे. आताही सुरत- हैदराबाद महामार्गासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा त्याग करावा लागणार आहे. शासकीय पातळीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ती रक्कम मिळणार असली तरी अनेकांना आपल्या जमिनी सोडल्याचे दुःख होणार आहे.