अहिल्यानगर
सिव्हिल हॉस्पिटल मृत्यूतांडवास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-प्रकाश पोटे
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : सिव्हिल हॉस्पिटल मृत्यूतांडवास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिव्हिल हॉस्पिटल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू मध्ये आग लागून 11 निष्पाप रुग्णांना प्राण गमवावा लागला. मागील 2-3 दिवसापासून या घटना स्थळाला अनेक मान्यवर भेट देत आहे. परंतु, त्यातून कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यावर केलेली दिसत नाही. सदर आयसीयू चे फायर ऑडिट झालेले आहे की नाही, याबाबतचे आभासी वृत्त समाजात पसरविले जात आहे. फायर ऑडिट झाले असल्यास सदर वॉर्डला लागलेली आग आटोक्यात का आली नाही? किंवा केलेले ऑडिट हे कागदपत्र पुरतेच मर्यादित आहे का ?आणि ऑडिट न झाल्यास का नाही केले गेले? जर केलेल्या ऑडिटमध्ये काही त्रुटी असतील तर मग याची पूर्तता न करताच वॉर्डमध्ये रुग्णांना दाखल का करून घेण्यात आले? यापूर्वीही महाराष्ट्रात अनेक शासकीय हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.
प्रामुख्याने शासकीय हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनता उपचार घेत असते आणि विनाकारण प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक निष्पाप गोर गरीब लोकांचा अशा घटनांमध्ये जीव जातो. प्रशासन मात्र 5 ते 7 लाख रुपये देऊन अशा घटना थांबवित असते. परंतु, कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई प्रशासकीय अधिकाऱ्यांवर यापूर्वी देखील झालेली नाही. त्यामुळे अशा घटना घडतच राहतात व प्रशासनाची डोळेझाक अशीच सुरू आहे. परंतु अहमदनगर येथील घटनेचा बोध घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर मनुष्य वधाचे गुन्हे येनाऱ्या आठ दिवसात दाखल करण्यात यावे. अन्यथा जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधिक्षक कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अविनाश काळे, फारुक शेख, सुशिल साळवे, संतोष त्रिंबके, संदीप तेलधुणे, किरण गाढवे, राजू साठे, मंगल पालवे, नसीर सय्यद, किरण जावळे, अमोल भंडारे, ज्ञानेश्वर महिस्माळे, दीपक गुगळे, गणेश निमसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.