अहिल्यानगर
शासकीय, निमशासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालयांचे फायर ऑडिट करा : रोडे
संदिप पाळंदे/आंबी : अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हकनाग गरीब रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी श्रीरामपूर उपविभागात राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात ग्रामपंचायत ते प्रांत कार्यालय इथपासून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांचे ‘फायर ऑडिट’ करून तेथे सक्षम आग प्रतिबंधक यंत्रणा कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष जालिंदर रोडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही महिन्यांत नाशिक, मुंब्रा, विरास, भंडारा, नागपूर त्यानंतर अहमदनगर येथील रुग्णालयात आगी लागून रुग्णाचे प्रशासनाच्या अनास्थेमुळे हकनाक बळी गेले आहेत. या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच या आगीत होरपळून मृत पावलेल्या व जखमी झालेल्या रुग्णांना अजूनही पुरेशी आर्थिक मदत मिळालेली नाही. राज्यात वारंवार अशा घटना घडूनही शासन निद्रावस्थेत आहे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे.
श्रीरामपूर विभागात ग्रामपंचायत, तलाठी, मंडलाधिकारी, कृषी, पशुवैद्यकीय, नगरपालिका, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शेकडो शाळा, महाविद्यालये यांबरोबरच सर्व तालुका, उपविभागीय स्तरावरील कार्यालये आहेत. भविष्यात आगीच्या घटना घडून जीवित हानी होऊ नये, शासकीय मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे फायर ऑडिट करून त्याठिकाणी सक्षम आग प्रतिबंधक यंत्रणा उभारून संबंधित आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.