महाराष्ट्र
गावखेड्यातील “स्मशानं” भोगताहेत मरणयातना, स्मशानाचं सोन होण्याची व्यक्त होतेयं अपेक्षा
माणूस जन्मला की या ना त्या कारणाने तो सतत क्रीयाशील असतो. सततच्या अनेकविध कामांमुळे तो नेहमी ताणतणावात असतो. यातचं एखादा सुखद प्रसंग घडला तर काहिकाळ तो तणावमुक्त होतो. परंतू हि तणावमुक्तीची स्थिती फारकाळ राहिलचं अस नाही. धनवान माणसाला संपत्ती सांभाळण्याचे टेन्शन तर निर्धन माणसाला संपत्ती कमावण्याचं टेन्शन, काहिजण म्हणतात ‘भिकाऱ्यासारखं जीवन नाही’ ना कसली चिंता ना प्रपंचाचा व्याप, पण भिकाऱ्यालाही भिक मागण्याच भलतं टेन्शन असत बरं…! त्यासाठी अनेक क्लुप्त्या कराव्या लागतात… प्रसिद्ध धार्मिक स्थळी तर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकालाच तासागणिक भिक मागण्याचे ठराविक पैसे मोजावे लागतात.
या आयुष्यभर असलेल्या नाना ताणतणावातून शेवटी माणसाची म्रुत्यूने सुटका होते असे म्हणतात. या सगळ्या ताणतणावातून मरणाने सुटका झाली तर अखेरचा प्रवास सहजसुलभ व्हावा म्हणून स्मशानाची रचना केलेली दिसते. त्या स्मशानातून तरी अखेर गोड होईल अशी इच्छा त्या मरणाराच्या नातेवाईकांची असते. पणं सद्यस्थितीत स्मशानाची अवस्था पाहिली तर त्या मृत देहालाही उठून स्मशानातून पळून जावसं वाटेल अशी स्थिती बहुतांश गावखेड्यात पहावयास मिळते.
‘स्मशान’ नावाप्रमाणेच बदनाम झालेला ‘शब्द’ ! हा शब्द कानावर पडल्यास सरकन अंगावर काटा येतो विविध भाषिक चित्रपटातही स्मशानाची अवस्था भयानक दाखवली जाते. त्यामुळे स्मशानाबद्दल दोनहात दूर राहणेच अनेकजण पसंत करतात. अशाही भयावह परिस्थितीत ग्रामीण भागातील स्मशानात एक जमात राहणे पसंत करते ते म्हणजे ‘स्मशानजोग’ ही जमात आपल्या अनेक पिढ्या स्मशानात जन्मतात, जगतात नि या स्मशानातच मरतात. त्यांना यापेक्षा जग वेगळं आहे हे माहीतही नसते. या जमातीला ना शिक्षणाचा गंध ना सणवार ना बाहेरचे जग अनेक पिढ्या स्मशानात खपता खपता आता बोटावर मोजण्या इतपत तरुण शिक्षित झाले आहेत. एखादा दुसरा नोकरीत आहे तर बहुतांश स्मशानावरच जगतात.
अशा या स्मशानावर स्मशानजोगी सारख्याच अनेकांचे रोजगार सुध्दा अवलंबून आहेत. मग त्यात सरपणवाला, मडके गाडगेवाला, बांबूवाला, प्रेत वाहतूकीवाला, कपडेवाला, हळदी कुंकवापासून चिल्लर ते मुरमुऱ्या वाल्यापर्यंत तर प्रेत जाळल्यानंतरच्या राखेची विल्हेवाट नदीपात्रात सोडल्यानंतर त्या राखेतील पैसे वा सोनेचांदीच्या वस्तू मिळविण्यासाठी नदीपात्रात बुड्या मारुन चाळणीने राख चाळणी करणारांचे पोट या स्मशानावर चालत आले आहे. जिवंतपणी मरणयातना भोगल्यानंतर आपल्या आप्तेष्ठांचा शेवट गोड व्हावा अशीच सर्वसाधारण अपेक्षा जनमाणसांची असते. पण स्मशानाच भेसूर स्वरुप पाहून जिथं प्रेतालाच उठून पळण्याची इच्छा व्हावी तिथे त्या प्रेताला घेऊन जाणाऱ्यांची अवस्था कशी होत असेल याची कल्पना केलेलीच बरी ?
शासन स्मशानभुमीचा नि परिसराचा विकास करण्यासाठी भरमसाठ निधी देत असते त्याचा उद्देश एकच असतो माणसाचा शेवट सर्वांगसुंदर व्हावा. शहरी भागात आता मृतदेह जाळण्यासाठी विद्युतदाहीन्या बसविल्या आहेत. शहरात जागा कमी असल्याने परिसर स्वच्छ असतो तेथे अहोरात्र कामगारांची रेलचेल असल्याने सुविधा उपलब्ध होत असतात. मात्र ग्रामीण भागातून स्मशानभुमीची देखभाल स्थानिक ग्रामपंचायतींकडे असते. तोकड्या मनुष्यबळाने स्मशानात सोयीसुविधा पुरविण्यात अडचणी येतात. यावर काही छोट्या, मोठ्या ग्रामपचायतींनी मार्ग काढत स्मशानात अनेकविध सोयीसुविधा पुरवत अद्यावत केल्या आहेत.
याचे ज्वलंत उदाहरण संगमनेर तालुक्यातील दुर्गम असलेल्या साकूर ग्रामपंचायतीचे द्यावे लागेल. येथील स्मशानात हिरवीगार झाडे, छोट्याशा ओढ्यांना नागमोडी वळणे देऊन अतिशय मनमोहक रुप दिले आहे. डोंगरटेकड्यांचे गाव असल्याने नैसर्गिकतेला अनुरुप असे देखणे रुप स्मशानाला दिल्याने पर्यटक सुध्दा येथे भेट देतात बरोबर स्थानिक विद्यार्थी या स्मशानात बसून अभ्यास करतात. शासकीय निधीचा अतिशय योग्य विनियोग या ग्रामपंचायतीने स्मशानासाठी केल्याचे अहमदनगर जिल्ह्यातील बहुधा हे पहिले उदाहरण ठरेल. बाकी ठिकाणी हा निधी येतो, खर्च होतो, मात्र दुसऱ्या वर्षी आहे तीच परिस्थिती असते. तीच भिंत ढासळलेली, दशक्रीयाविधी ओटा अस्ताव्यस्त, प्रेत जाळण्याच्या ठिकाणी मोठा खड्डा, पाण्याच्या टाकीचे तीनतेरा वाजलेले तर कुण्या मोठ्या आमदार, खासदार, वा मंत्र्यांनी गाजावाजा करुन सामुहीक वृक्षारोपणाचा खड्डा पुढच्या वर्षीच्या वृक्षारोपनाच्या प्रतिक्षेत जवळपास अर्ध्याहून अधिकचा निधी या कामातून कुणाच्यातरी खिशात पाझरलेला असतो म्हणूनच स्मशानालाच मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
या स्मशानाच्या मरणयातनेला जितके कारणीभुत गावकारभारी आहेत, तितकेच किंबहुना त्याहून अधिक कारणीभुत मरणाराचे आप्तेष्ठ आहेत. ते कसे तर स्मशानात आणलेल्या वस्तू मग ते बांबू, मडके गाडगे, मृताचे जूने कपडे व तत्सम वस्तू, तुपाच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, मिठाच्या पिशव्या, मडक्याला छिद्र पाडण्यासाठीचे दगड, मुरमुऱ्यांची रिकामी वेस्टन, भात, भाकरींचा सडा, लिंबाच्या पाल्यांच्या डहाळ्या प्रेत जाळल्यानंतरची राख या सर्व वस्तूंची विल्हेवाट न लावता त्या तशाच पडू देणं नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर अशाच प्रकारचा हलगर्जीपणा… यामुळे हा कचरा दिवसेंदिवस साठला जातो यातून दुर्गंधी पसरते हा कचरा आण्यासाठी उंदीर, घुशी, डुकरांसारख्या प्राण्यांचा वावर वाढल्याने त्यांना खाण्यासाठी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढतो व त्यातून अंत्यसंस्कारावेळी अनेक ठिकाणी सर्पदंशाचे वा विंचूदंशाचे प्रकार घडतात वरुन ग्रामपंचायतीला जबाबदार धरुन शिव्यांची लाखोली वाहीली जाते. जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे सोपे असते. जूनी माणसं म्हणायची ‘काशी केलेली दिमाखात सांगतो पणं मांजर मारलेलं झाकून ठेवतो’ त्याप्रमाणे आपलही काही चूकत आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरले जाते.
स्मशान साफसफाई व स्वच्छता व सुशोभित करण्यासाठी दरवर्षी अनेक कार्यक्रम मोठा गाजावाजा करुन, पत्रिका छापून, लाउडस्पीकर लावून, हारतुरे घालून, एकमेकांची उणेदुणे काढून राबविले जातात. तथापी त्यात सातत्य नसल्याने हे कार्यक्रम कुचकामी ठरत आहेत. यावर समाजप्रबोधनाचीच व स्वतः जबाबदारी उचलुन व स्वतः पासूनचं सुरुवात करण्याची खरी आवश्यकता आहे. नुकताच कोरोनाकाळ आपल्याला याबाबतीत सजग करून गेला आहे. आपल्या आप्तस्वकीयांचे पार्थिव शरीर आपल्याला या काळात मिळाले नाही. दवाखानास्थित स्थानिक महानगरपालिका, नगरपंचायती या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत होत्या. मग त्या पार्थिवाला ना शेवटची अंघोळ, ना नवीन कपडे, ना तिरडी, ना नातेवाईक तरी त्या पार्थिवावर व्यवस्थित अंत्यसंस्कार होत होतेच नि कोरोनाचा प्रोटोकॉल असल्याने कुणाची कुरकुरही नव्हती.
आपल्या गावातील स्मशानात कधीकाळी आपल्याला जावे लागेल हे मनात ठरवून अंत्यसंस्कार झाल्यानंतर झालेला कचरा किंवा वस्तूंची आपण प्रामाणिकपणे व ठरवून दिलेल्या जागेत व्यवस्थित विल्हेवाट लावली, मरण पावलेल्या व्यक्तिंचे कपडे व अन्य वस्तू फेकून किंवा न जाळता गरजूपर्यंत पोहोचविल्या तर पुण्य मिळेलच वरुन या वस्तू एखाद्याच्या कामी आल्याचं समाधान मिळेल हे वेगळं प्रेतावर मुरमुरे व चिल्लर उधळण्यापेक्षा गरजू व भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविल्या तर त्यांचे आशिर्वाद मिळतील हे वेगळे सांगायला नको तर आपण आपले घर परिसर स्वच्छ ठेवतो. त्याप्रमाणेच स्मशान आपलीच संपत्ती व वास्तू आहे. तीही नीटनेटकी, सुशोभित ठेवली तर अन्य आप्तेष्ठांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो तर स्मशानातील वातावरण आल्हाददायक मिळेल यात शंका नाही. एकुणच स्मशानाच भेसूर चित्र बदलण्यासाठी आपणचं बदललं तर … स्मशानही मोकळा श्वास घेतील नि त्या स्मशानातील जगवलेल्या बहरलेल्या झाडांमुळे आपल्यालाही मोकळा श्वास मिळेल हे निश्चित.