ठळक बातम्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्त शेतकरी करणार मुंबईत सामुहिक आत्मदहन
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे उर्वरित प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्वरित सेवेत सामावून न घेतल्यास मुंबईत मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे सन १९६८ साली स्थापन झाले. त्यावेळी राहुरी तालुक्यातील खडांबे, सडे, वरवंडी, डिग्रस, प्रिंप्री अवघड, राहुरी खुर्द या सहा गावातील ५८४ खातेदारांच्या २८४८.८८ हे. जमिनीचे संपादन करून हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. आज रोजी सदर विद्यापीठास ५१ वर्षे पूर्ण होऊन गेले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन शेतकऱ्यांना त्याच्या वारसांना विद्यापीठ मध्ये नोकरी देण्याची तरतूद असताना ही आजही काही प्रकल्पग्रस्त नोकरीच्या आशेवर आहेत. प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठ प्रशासनास निवेदने दिली, मंत्रालयीन प्रशासनास देखील वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरीही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये ५०% पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. प्रकल्पग्रस्त यांनी खूप वेळा आंदोलने केली, उपोषण केले, तरी देखील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विद्यापीठ शिक्षण, संशोधन, विस्तारासाठी घेतल्या, त्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नसून, प्रकल्पग्रस्त कृती समितीने दि. ०९ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या न्याय हक्कासाठी सामुदायिक आत्मदहन मुंबई मंत्रालय येथे करण्याबाबत निर्णय घेतला आहे. तरी सदर विषयी तात्काळ उच्च स्तरीय संयुक्त बैठक घ्यावी असे कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ यांनी निवेदनात कळविले आहे. तरी शेतकऱ्यांना न्याय व त्यांच्या हक्काच्या नोकरी मिळवून देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावे अशी विनंती करण्यात आली.
या बाबत तातडीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालून बैठक घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती प्रकल्पग्रस्त कृती समितीचे संघटक सम्राट लांडगे यांनी केली आहे.
या निवेदनावर रविंद्र धामोरे, बाबासाहेब बाचकर, सम्राट लांडगे, पाराजी डोईफोडे, विजय शेडगे, वैभव शेडगे, रवि गायकवाड, सौ. भाग्यश्री पवार, संतोष पानसंबळ, योगेंद्र शेडगे, मनोज बारवकर, शलमोन गायकवाड, श्रीकांत बाचकर, अमोल धोंडे, शुभम साळवे, किशोर शेडगे, प्रविण गाडेकर, राहुल शेटे, प्रमोद तोडमल, मंजाबापू बाचकर, लक्ष्मीकांत वाघ, राहुल लहारे, जनार्धन दळे, शीतल गायकवाड, विकास कल्हापुरे, मंजाबापु बाचकर विशाल निमसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.