साहित्य व संस्कृती

नवोदितांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी शब्द गुंफण ची निर्मिती – राजेंद्र उदागे

चिंचोली/ बाळकृष्ण भोसलेनवोदितांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी शब्द गुंफण या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे, यामुळे नवोदित कवींना संधी मिळते, त्यांना शब्दगंध सोबत जोडून घेऊन साहित्यिक चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात, असे प्रतिपादन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले. 


दिपावली च्या पूर्वसंध्येला शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सुनील गोसावी संपादित ‘शब्द गुंफण’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी विचारपीठावर सुभाष सोनवणे, प्रा.डॉ.अशोक कानडे, अजयकुमार पवार, भगवान राऊत, किशोर डोंगरे इ मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, आपला आनंद आपणच शोधायला हवा, त्यासाठी लेखन हे चांगले माध्यम असुन वाचन लेखनामुळे मनशांती मिळते.

कवी सुभाष सोनवणे म्हणाले कि, अनेकजण आपल्या लेखनाची सुरुवात दिवाळीच्या सुट्टीत करतात, पण आज सर्वांचे एकत्रित मिळुन पुस्तकं होत आहे, हि आनंदाची गोष्ट आहे. सुनील गोसावी प्रास्ताविक करताना म्हणाले कि, कोरोना कालावधीत सर्वच गोष्टींवर बंधने आल्याने माणसांना एकमेकांना भेटणे मुस्किल झाले होते, अश्यावेळी ऑनलाईन कार्यक्रम घेऊन दुधाची तहान ताकावर भागविण्यात आली. त्याच्याच पुढच्या टप्प्यावर हा संग्रह प्रकाशित होत आहे. त्या माध्यमातून नवोदितांना ऊर्जा, प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी केले तर किशोर डोंगरे यांनी आभार मानले.

यावेळी प्रा.डॉ.दिगंबर सोनवणे, बबनराव गिरी, शर्मिला गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रातिनिधिक काव्य संग्रहामध्ये नगर, बीड, मुंबई, जळगांव, पुणे, ठाणे, लातुर येथील प्रा.मधुसूदन मुळे, रोहिणी उदास, प्रा.अमोल आगाशे, डॉ.जतीनबोस काजळे, किरण बैरागी, भाऊसाहेब कासार, गीताराम नरवडे, उषा खंडागळे यांच्यासह अनेकांच्या कवितांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button