अहिल्यानगर
जैविक इंधन निर्मितीमुळे आपले अर्थकारण, आरोग्यजीवन समृद्ध होईल-अर्थतज्ञ डॉ. बबनराव आदिक
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : आज जग श्वास घेण्यासाठीही स्वच्छ राहिलेले नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 120 देशाच्या बैठकीत ब्रिटनमध्ये कॉप 26 च्या ग्रुपमध्ये हवामान आणि प्रदूषण याविषयीं दिशा ठरवत आहेत अशा पार्शवभूमीवर आपण जैविक इंधन निर्मितीवर गंभीरपणे चर्चा करीत आहोत, जैविक इंधन निर्मितीमुळेच आपले अर्थकारण आणि आरोग्यजीवन समृद्ध होईल असे विचार अर्थतज्ञ डॉ.बबनराव आदिक यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील जीतशार फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे डावखर मंगल कार्यालयात जैविक इंथन निर्मिती कंपनी सभासद आवाहन बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष रंजित दातीर उपस्थित होते. सरपंच भारत तुपे, सूर्यभान डावखर, संदीप दातीर, राजेंद्र येळवंडे, विष्णू भगत, देवेन्द्र भगत, नरेंद्र भगत, अण्णासाहेब लबडे, बबनराव लबडे, नंदू लबडे, बक्करभाई इनामदार, बापूसाहेब लबडे, सकाहरी कांदळकर, धनंजय काळे आदी उपस्थित होते.
भैरवनाथ गावाचे कंपनीचे ग्रामोउद्दोजक नरेंद्र भगत यांनी स्वागत, प्रास्ताविक केले तर विष्णू भगत, देवेंद्र भगत यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी दीपावलीनिमित्त वाचन संस्कृती वाढावी म्हणून अनेकांना ग्रन्थ भेट देऊन वाचन हेच खरे दीपज्योत लावणे आहे, असे सांगून “दिवाळीच्या ज्ञानज्योती”आणि “जैविक इंधन भारी “या कविता सादर केल्या. संतांनी देह देवाचे मंदिर सांगितले ते निर्मळ असेल तरच आरोग्य मिळेल असे सांगून जीतशार कंपनी सुरु झाली की आपण सुखी होऊ असे मत व्यक्त केले.
डॉ. बबनराव आदिक यांनी आजचे हवामान, महापूर आणि इंधनाच्या वाढत्या किंमती याबद्दल माहिती दिली. सर्वांच्या सहकार्यातून 2022 ची दिवाळी जैविक इंधन, गॅस आणि स्वच्छ, विषमुक्त वातावरणात साजरी करू असा आशावाद व्यक्त केला. अध्यक्ष भाषणात रंजित दातीर यांनी खानापूर येथे जैविक इंधन कारखान्याचे भूमिपूजन झाले आहे. डॉ. बबनराव आदिक यांच्या शेतशिवारात भव्य कंपनी उभी राहत आहे, गावोगावी भरपूर रोजगार निर्मिती होईल, आपल्या गिन्नी गवताला भरगच्च भाव मिळेल आणि गॅस, इंधन अतिशय कमी भावात मिळेल, सुरक्षित असलेले इंधन सिलेंडर सभासदास कमी भावात मिळेल त्यासाठी सभासद होऊन आपले अर्थकारण दुप्पट करा आणि जमिनीला विषारी बियाणे, खते यातून मुक्ती द्यावी असे आवाहन केले. शेतकरी, ग्रामस्थांच्या अडीअडचणींवर चर्चा केली. ग्रामोउद्दोजक नरेंद्र भगत यांनी आभार मानले.