पश्चिम महाराष्ट्र

ग्रंथालय कर्मचा-यांची दिवाळी यंदा अंधारातच ? सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणार – आमदार कपिल पाटील

ग्रंथालय व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे समस्यांबाबत आ. कपिल पाटील यांच्याशी चर्चा करताना संभाजी पवार… 

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : ग्रंथालय चळवळीसमोर आज अनेक समस्या असून ग्रंथालये व ग्रंथालयीन कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवला जाईल असे प्रतिपादन लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले.


सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्यासंदर्भात ‘राज्य ग्रंथालय संघा’चे सदस्य संभाजी पवार यांच्या नेर्तृत्वाखाली ग्रंथालय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आमदार कपिल पाटील यांची भेट घेवून ग्रंथालयीन प्रश्नासंबंधी सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कपिल पाटील बोलत होते.

सार्वजनिक ग्रंथालये टिकवण्यासंदर्भात वर्षानूवर्ष सरकारी स्तरावरून केवळ आश्वासनांचीच पाने पुढे करण्यात येत आहेत. “गाव तेथे ग्रंथालय” ही घोषणा करूनही महाराष्ट्रात ४५ हजार गावे असताना प्रत्यक्षात १२ हजार सार्वजनिक ग्रंथालये कार्यरत आहेत. सार्वजनिक ग्रंथालयाकडे निवृत्तांच्या जोडीला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीबरोबरच, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. पण तुटपुंजे अनुदान आणि तेही वेळेत नाही. आज ८ महिने झाले ग्रंथालयीन कर्मचा-यांना वेतन नाही. यावेळची दिवाळी अंधारातच जाईल की काय? अशी शक्यता आहे. नवीन ग्रंथालयांना मान्यता न देणे, दर्जाबदल नाकारणे यामुळे वाचन चळवळीस खीळ बसली आहे.

आमदार कपिल पाटील यांनी शासनदरबारी ग्रंथालयांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी संभाजी पवारांनी त्यांच्याकडे केली. यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले की, वैचारिकदृष्ट्या सक्षम पिढी घडविण्यासंदर्भात ग्रंथालयाचे महत्व लक्ष्यात घेवून ग्रंथालयाचे अनुदान वाढ, दर्जाबदल, नवीन मान्यता, किमान जगण्यायोग्य वेतन या व इतर प्रश्नांसंदर्भात विधिमंडळात आवाज उठवला जाईल अशी ग्वाही आमदार कपिल पाटील यांनी दिली. यासाठी ग्रंथालये व ग्रंथालयीन कर्मचा-यांनी संघटीत होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संभाजी पवार, शिक्षकनेते सुनिल गाडगे, जितेंद्र आरू, आप्पासाहेब जगताप, बाबासाहेब लोंढे, सुरेखा पवार, नवनाथ घोरपडे, संतोष देशमुख, काशिनाथ मते, योगेश हराळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. शिष्टमंडळात युवाग्राम संस्था, श्री.कदमराव पवार सार्वजनिक वाचनालय व जिल्ह्यातील सार्वजानिक ग्रंथालय प्रतिनिधींचा सहभाग होता.

Related Articles

Back to top button