प्रासंगिक

महागाईचा उद्रेक…सरकार मात्र निद्रेत…!

राज्यात एकीकडे कोरोना संकटामुळे जवळपास सर्वच क्षेत्राला फटका बसला असून त्यात महागाईच्या उच्चांकामुळे सर्वसामान्य जनतेची अवस्था ही आगीतून उठून फुुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार मात्र एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, स्टील, सिमेंट, फर्निचर, खते, औषधं जवळपास सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या असून या सर्व परिस्थितीशी संघर्ष करताना सामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. सरकार व व्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून सध्यातरी महागाईच्या मुद्द्यावर मात्र सर्वच मूग गिळून गप्प आहेत. उलट आपण किती उत्तम काम करतो हे खोटं बोला पण रेटून बोला या म्हणीप्रमाणे जनतेला पटवून देण्यात, जाहिरात करण्यात सरकार खुप तत्पर आहे. अजून किती दिवस जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवायचा? किती दिवस जनतेने तुमच्या प्रलोभनांना बळी पडायचं? किती दिवस सत्ता, हुकूमशाही, गुलामगिरीच्या प्रवाहात जनतेने वाहायचं या गोष्टीचा विचार करण्याची खरी वेळ आता आली आहे. काळ खुप कठीण आहे आज प्रत्येक पाऊलोपाउली संघर्ष असून महागाईमुळे आज अनेक कुटूंबाच्या प्राथमिक गरजा देखील पूर्ण होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महागाईमुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी आणखी मोठी होणार असून त्यामुळे भविष्यात खुप मोठी विषमता निर्माण होईल. मागील काही दिवसांपासून महागाईचा आलेख हा टप्याटप्याने न वाढता झटपट वाढला आहे त्या पटीने शेतमालाचे बाजारभाव मात्र वाढले नाहीत हिच मोठी शोकांतिका आहे. सध्या तरी कट्टर समर्थक, उजवा हात, डावा हात, विश्वासू यांनी महागाईवर खरोखरच विचार करण्याची गरज आहे. सत्तेचे केंद्रीकरण झालं कि हुकूमशाही निर्माण होते. परंतु प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच त्याप्रमाणे हुकूमशाहीचे यशापयश हे सर्वस्वी प्रजासत्ताक नागरिकांच्या स्वविवेक बुद्धीवरच अवलंबून असते. जनतेने नेहमीच भावनिक प्रश्नांत गुंतून न राहता आपल्या मूलभूत हक्क मागण्यांसाठी सजग असणं गरजेचे आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून काही महाभाग इतर देशात पलायन करतात तो पैसा हा सरकारचा नाही तर जनतेचा असतो मात्र या गोष्टी कोणी गांभीर्याने घेत नाहीत त्याचेच हे दुष्परिणाम आहेत असो, जनतेने इथून पुढील काळात अजून किती दिवस महागाईच्या प्रवाहात वाहायच याचा विचार करण्याची खरी वेळ आता आली आहे तरच प्रजासत्ताक या शब्दाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल…!
बाळासाहेब भोर 
क्रांतीसेना, संगमनेर
( राज्यशास्त्र विषयातून पदवीधर )

Related Articles

Back to top button