अहिल्यानगर

श्रीगोंदा तालुक्यात महोगनी वृक्ष लागवडीचे प्रस्ताव धुळखात; तर रस्त्यांची दुरावस्था… क्रांतीसेनेचे तहसीलदारांना निवेदन

नायब तहसीलदार ढोले मॅडम यांना मागण्यांचे निवेदन देताना क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, तालुकाध्यक्ष संदीप डेबरे, युवक तालुकाध्यक्ष विकास म्हस्के आदी…


श्रीगोंदा प्रतिनिधी : तालुक्यातील शेतकऱ्यांचे मग्रारोहयो अंतर्गत महोगनी वृक्ष लागवडीचे धुळखात पडलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी, कुकडी कॅनल १३२ ला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप होण्यासाठी व तालुक्यातील रस्ते दुरुस्ती करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने नायब तहसीलदार ढोले मॅडम यांना देण्यात आले आहे.
क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन-२०२१ ते २२ या काळात मग्रारोहयो अंतर्गत वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांची नावे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. परंतु अहमदनगर जिल्ह्यात दि. १७ फेब्रुवारी २०२१ ला मग्रारोहयो अंतर्गत महोगनी वृक्ष लागवड करणेबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीची बैठक झाली. परंतु त्या बैठकीत लागवडीचा कोणताही निर्णय झाला नाही, शेतकरी व अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांनी पाठपुरावा केल्यानंतर उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक ( मग्रारोहयो ) जि. प. अहमदनगर यांनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त व पत्रच रद्द केले. मग बैठक चुकीची होती का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पत्रच रद्द केल्यानंतर लागवडी बाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. तत्पूर्वी वरील बैठकीमुळे त्यावेळी असणारे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या व एपिओंच्या बैठकीत महोगनी वृक्ष लागवडीचे प्रस्ताव घेऊ नका असे सांगितल्यामुळे अद्याप पर्यंत प्रस्ताव ग्रामपंचायत मध्येच मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. वास्तविक पाहता १७ फेब्रुवारी २०२१ ची बैठक रद्द झाली, मग महोगनी वृक्ष लागवड प्रस्ताव स्विकारून पुढील कार्यवाही होणे गरजेचे होते. ते अद्याप झालेले नाही, पूर्वी बैठकीत “प्रस्ताव घेऊ नका” हे गट विकास अधिकारी यांनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या बैठकीतील मुद्द्यांच्या आधारे सांगितले. पण ही बैठकीचे इतिवृत्त व पत्र रद्द केल्याने पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे, ते अद्याप झालेले नाही. त्यावेळचे गटविकास अधिकारी यांची बदली झाली आहे. नव्याने आलेले गट विकास अधिकारी ह्यांना मागील वृत्तांत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यांना विचारले की प्रस्ताव का मंजूर होत नाही ? त्यांनी सांगितले की आम्ही घेत आहोत पण पूर्वी ग्रामसेवकांसोबत झालेल्या बैठकित“घेऊ नका”हेच तालुक्यातील ग्रामसेवकांना माहित आहे. पुन्हा बैठक घेऊन प्रस्ताव घ्या व गटविकास अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवा हे ग्रामसेवकांना अद्यापपर्यंत माहित नाही. त्यामुळे प्रस्ताव पडून आहेत, तरी योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करावी.
तसेच तालुक्यातील सर्वच रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून दुचाकीवर प्रवास करणेही जिकीरीचे झाले आहे. या खड्ड्यांमुळे दररोज कुठेना कुठे अपघात होत आहे. यातुन प्राणांतिक अपघात होऊ शकतो, तरी लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवावे. तसेच कुकडी कॅनल १३२ ला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप होणे गरजेचे आहे, गेली दोन ते चार रोटेशन पासून शेतकऱ्यांना पाणी फक्त मोठ्या चारीलाच दिसते, चारी ला पाणी येते पण शेतकर्यांची शेती मात्र कोरडीच राहते, तरी श्रीगोंद्यास पाण्याचे पूर्वीप्रमाणे समन्यायी वाटप करून पाणी लाभधारक शेतकऱ्यांना मिळणे शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे योग्य कार्यवाहीची अपेक्षा आहे, तरी दि. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वरील सर्व समस्या सोडवाव्यात अन्यथा संबंधित लाभधारक शेतकरी व प्रवासी ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येईल. या कोरोना महामारी सारख्या काळात शेतकऱ्यांवर आंदोलन व निदर्शने करण्याची वेळ आणू नये. या मागण्यांचे निवेदन क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, तालुकाध्यक्ष संदीप डेबरे युवक तालुकाध्यक्ष विकास म्हस्के यांनी दिले आहे.

Related Articles

Back to top button