ठळक बातम्या
इपीएस -95 पेन्शन वाढ प्रश्न लोकसभेत मांडणार खासदार प्रज्ञा ठाकूर
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : आज रविवारी भोपाल मध्य प्रदेश येथे इपीएस 95 पेन्शन वाढ संदर्भात राज्यस्तरीय पेन्शनधारकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पेन्शन वाढीचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे व लोकसभेत हा प्रश्न तातडीने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलेे.
प्रारंभी खासदार प्रज्ञा ठाकूर, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, राष्ट्रीय सल्लागार पी एन पाटील, महासचिव विरेंद्रसिंग राजावत, अध्यक्ष भदोरिया, पश्चिम क्षेत्र संघटक सचिव सुभाष पोखरकर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण होन, राष्ट्रीय महिला अध्यक्ष शोभाताई आरस, नगर जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, भगवंत वाळके, बाबासाहेब चेडे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले की आपली संघटना देशभर एकजुटीने वाढत आहे. पेन्शन वाढीचा प्रश्न दिवाळीपर्यंत मार्गी लावावा अशी सरकारकडे मागणी केली आहे. लाखो पेन्शनधारकांची कोट्यावधी रक्कम सरकारकडे जमा आहे. त्यातून पेन्शन वाढ करायला हवी, त्यासाठी वेगळी तरतूद करायची गरज नाही. काही राज्यात वृद्धांना त्यांचे अंशदान नसताना 2500/-ते 3000/-दरमहा दिले जातात. मग हा प्रश्न मार्गी का लागत नाही. EPFO कार्यालय चुकीची कारणे सांगून दिशाभूल करीत आहे. सिबिटी कमिटीत कामगार संघटना प्रतिनिधी असून सुद्धा हा प्रश्न प्रलंबित ठेवला. आमची मागणी रु 7500/- व अधिक महागाई भत्ता अशी पेन्शन दरमहा मिळावी, पती पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी. सर्वोच्च न्यायालय निर्णय प्रमाणे हायर पेन्शन मिळावी जे पेन्शनपासून वंचित आहेत त्यांना किमान रु 5000/-दरमहा मिळावेत. आपला प्रश्न दिवाळीपूर्वी मार्गी न लागल्यास पुढील दिशा ठरविली जाईल असे राऊत म्हणाले.
येत्या 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता औरगाबाद सिडको बस स्थानकजवळ अग्रसेन भवन येथे केंद्रित अर्थमंत्री डॉ भागवतराव कराड यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यास महाराष्ट्रातील पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पश्चिम क्षेत्र संघटक सुभाष पोखरकर यांनी केले आहे.