निधन वार्ता
आप्पासाहेब पारखेंच्या रुपाने ‘दिलेर समाजसेवक’ काळाच्या पडद्याआड
राहुरी : समाजाप्रती आपण काही देणं लागतो या समर्पक भावनेने समाजसेवा करणारे फार थोडे असतात. परंतू तालुक्यातील चिंचोली येथील आप्पासाहेब त्रिंबक पारखे हे याच समर्पक भावनेने समाजघटकांप्रती जगले अशा या समाजसेवकाचा कोविडने बळी घेतला. अतिशय कमी वयात त्यांच्या जाण्याने चिंचोली व परिसरावर शोककळा पसरली आहे. नंदादीप दुग्धालय, नंदादीप पशुखाद्य केंद्र, नंदादीप हॉटेल अशा नंदादिप लघुउद्योगांचे संस्थापक व चिंचोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पारखे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कोविडमुळे दु:खद निधन झाले. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. गावात बातमी पसरताच अख्ख्या गावावर शोककळा पसरली.
अत्यंत शांत, संयमी व मितभाषी स्वभावाचं हे व्यक्तिमत्त्व, आयुष्य जरी कमी मिळालं असलं तरी या एकंदर जगलेल्या आयुष्यात ते नेहमी समाजासाठी झगडत राहिले. त्यांची सुखदुःख, लग्नकार्य, व अडीअडचणी साठी धावून जात. जे शक्य असेल जितक्या अडचणी सोडविणं शक्य असेल त्या सोडविण्यासाठी सतत संघर्षरत राहिले. ग्रामपंचायत व सहकारी संस्थेवर पदाधिकारी असल्यानंतर शेवटच्या घटकापर्यंत कोणताना कोणता लाभ मिळवून देण्यासाठी आग्रही राहिले.
आपल्या उघुउद्योगातून मदतीचा हात नेहमीच देत आले. समाजसेवेचे व्रत जपत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मुलांना शिक्षणासाठी आग्रही राहिले. मुलाला मेकॅनिकल इंजिनिअर केले तर दोन मुलींनाही पदवीधर करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. त्यांच्या पश्चात एका मुलासह दोन विवाहित मुली, पत्नी असा परिवार आहे. अशा या दिलेर व्यक्तिमत्वाचा कमी वयात अंत झाल्याने त्यांच्या आदर्शावर त्यांच्या मुलांनीही वाटचाल करण्याचं बळ त्यांच्यात यावं हिच त्यांच्यासाठी खरी श्रध्दांजली…