अहिल्यानगर
शेंडी ज्युनिअर कॉलेजमध्ये निवडणूक साक्षरता मंचची स्थापना
कोविड १९ चे पालन करून ज्युनियर कॉलेज शेंडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम : प्राचार्य रोंगटे डी.एन.
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : भारत निवडणूक आयोग पुरस्कृत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व मंडळांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया बद्दल माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये भावी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याविषयी, मतदान करण्या विषयी तसेच लोकशाही विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी भंडारदरा येथे प्राचार्य रोंगटे डी.एन., नोडल अधिकारी महेश पाडेकर, आनंद चौधरी, बाबाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक साक्षरता मंचची स्थापना झाली.
या मंचाचे अध्यक्ष गुडनर करण गोपीनाथ इयत्ता १२ वी विज्ञान या विद्यार्थ्यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून भोईर शितल दत्तात्रय इयत्ता ११ वी कला या विद्यार्थिनींची निवड झाली. राज्यातील सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याचे आदेश आले होते. त्या अनुषंगाने विद्यालयाचे प्राचार्य रोंगटे डी.एन. यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक साक्षरता मंचची स्थापना करण्यात आली. या मंच मध्ये विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या प्रत्येक वर्गातील दोन प्रतिनिधींची निवड करून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाली. नोडल अधिकारी म्हणून महेश पाडेकर, आनंद चौधरी, गायकवाड आर.बी. यांनी काम पाहिले.
आगामी काळात निवडणूक साक्षरता सप्ताह, निबंध स्पर्धा, कथालेखन, पथनाट्य युवक संवाद, चर्चासत्र, घोषवाक्य, वेबसंवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन निवडणूक साक्षरता मंचच्या साह्याने केले जाईल असे प्रतिपादन नोडल अधिकारी महेश पाडेकर व गायकवाड आर बी यांनी सांगितले. ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकशाही पद्धतीने कोविड-१९ च्या नियमाचे पालन करून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पाडली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य लाभले तसेच विद्यालयातील गावंडे पी. एम., वाळेकर ए.सी., एकनाथ मुकणे, गोपाल दराडे, विकास आवारी, चव्हाण आर.आर., किरण आवारी, बाळसराफ डी.एम., सावंत एस.बी., मेंगाळ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.