कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्यामध्ये सामंजस्य करार

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व लखनऊ येथील अखिल भारतीय समन्वीत ऊस संशोधन संस्था यांच्यामध्ये नुकताच सामजंस्य करार करण्यात आला. शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी दीर्घकालीन संशोधन करणे, वैज्ञानिक विचारांची देवाण-घेवाण करणे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करणे व संयुक्त प्रशिक्षण घेणे इत्यादी उपक्रम संयुक्तरीत्या राबविण्यासाठी सदरचा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
या कराराद्वारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था यांचे संयुक्त विद्यमाने कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पीक शरीरक्रिया शास्त्र, जैव रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान इत्यादी संशोधन प्रकल्प हाती घेतले जातील. संशोधनाचे कामात दोन्ही संस्था एकमेकांना सहकार्य करतील तसेच या कराराअंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ येथे उच्च शिक्षण घेणारे पदव्युत्तर व पीएचडीला असलेले विद्यार्थी आणि संशोधक यांना संशोधन करण्यासाठी मदत केली जाईल व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि लखनऊ येथील ऊस संशोधन संस्था यांचे संयुक्त सहयोगाने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे संशोधन करण्यास वाव देणे, विविध विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा भरविणे, शेतकरी मेळावे घेणे, विस्तार शिक्षण, नवनवीन तंत्रज्ञान यासंदर्भात संधी उपलब्ध होणार असून त्याचा आपले राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि विद्यार्थी यांना फायदा होणार आहे. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. या कराराचे वेळी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर आणि ऊस पैदासकार डॉ. रामदास गारकर हे उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या वतीने प्रवरानगर येथील जैविक नियंत्रण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे आणि डॉ. योगेश थोरात हे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button