अहिल्यानगर

कवितेत कमी शब्दात व्यक्त झालं तरच शब्दांचा सुगंध दरवळतो – डॉ. डी.डी. पवार

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : संवेदनशील माणुसच साहित्य निर्मिती करू शकतो, त्यासाठी ‘शब्दगंध’ देत असलेले प्रोत्साहन महत्वाचे असुन स्वतःची स्वतंत्र शैली असेल तर तो व्यक्ती साहित्यिक होऊ शकतो, कवितेत कमीतकमी शब्दात व्यक्त व्हावं लागतं, तरच शब्दांचा सुगंध दरवळत राहतो, असे मत आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.डी.डी.पवार यांनी व्यक्त केले.


शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विलास गभाले यांच्या ‘चुरगळलेली अक्षर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.डी. डी.पवार यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.कैलास कांबळे, प्रमुख पाहुणे विद्यार्थी कल्याण व राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.महावीरसिंह चौहान, प्राचार्य चंद्रकांत भोसले, किशोर डोंगरे, शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ.पवार म्हणाले कि,‘साहित्यिक समाज मनाचा आरसा असतो, समाजातील बऱ्या वाईट घटनांचा वेध घेऊन तो शब्दरूप होतं असतो, त्यामुळे लेखन कलेला प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.’डॉ.महावीरसिंह चौहान म्हणाले कि,‘शब्दगंध ने अनेकांना लिहिते केले असुन ही चळवळ वाढणार आहे,’ 

प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले कि,‘मनातील भावबंध कमीतकमी शब्दात नीटपणे मांडले की त्याची कविता होते, हे तंत्र विलास गभाले यांच्या चुरगळलेली अक्षर मधुन दिसुन येते, कवितेतील चित्र अधिक बोलके असल्याने ती नीटपणे समजते.’अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.कांबळे म्हणाले कि,‘जाणता राजा पाठीमागे असेल तर कोणतीही चळवळ पुढे जाण्यास वेळ लागणार नाही, आपण कोणते काम करतो हे महत्त्वाचे नसून कोणत्या जाणिवेनं आपण ते करतो ते महत्वाचे आहे, शेतकऱ्यांचे दुःख कथा कावितेतून आल्यास त्याची दखल घ्यावी लागते.

प्रसंगी किशोर डोंगरे, विलास गभाले, मिराबक्ष शेख, आनंदा साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन कवी सुभाष सोनवणे यांनी केले तर शेवटी खजिनदार भगवान राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास चित्रकार सतीश नालकर, जयश्री झरेकर, स्वाती जोशी, प्रभाकर मकासरे, जयश्री मंडलिक, शर्मिला रणधीर, मनीषा गोसावी, प्रशांत सूर्यवंशी, बाळासाहेब मुंतोडे यांच्यासह राहुरी तालुक्यातील साहित्यिक व कवी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button