अहिल्यानगर
सात्रळ रयत शैक्षणिक संकुलात अक्षर मानव वाचनालयातर्फे वाचन प्रकल्पाचे उद्घाटन
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : सात्रळ रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अक्षर मानव वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने वाचन प्रेरणा दिनही साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम वाचनालयाचे अध्यक्ष युवानेते पंकज कडू पाटील यांनी सुरू केला.
सात्रळ पंचक्रोशीत पंकज कडू पा. यांच्या व त्यांचे अनेक युवा सहकारी यांच्या माध्यमातून विविध समाजहिताचे, समाजप्रबोधनाचे, लोक कल्याणकारी उपक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. यामध्ये राजन खान सर यांच्या सहकार्याने अक्षर वाचनालय चालविले जाते. आदिवासी व दलित वस्तीतील मुला-मुलींना घरोघरी जाऊन वाचनीय पुस्तके देऊन वाचन संस्कृती विकसित केली जाते.
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून सह्याद्री देवराई या उपक्रमांतर्गत सात्रळ गावात व या गावाला जोडणाऱ्या दुर्दफा रस्त्याच्या कडेच्या बाजूंना वृक्षारोपण केले आहे. यात तांदूळनेर येथील खंडोबाचा माळ येथे कॉ.पी.बी कडू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिनेअभिनेते सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आल्यानंतर त्यांच्या शुभहस्ते विविध औषधी वनस्पतींची वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करियर गाईडन्स, गावात दिशादर्शक बोर्ड लावणे, स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच वयोवृद्ध व निराधार रुग्णांना हॉस्पिटल बेड, व्हीलचेअर, वाकर्स, काठी, औषधे तसेच त्यांना उपजीविकेसाठी किराणा सामान इ. बाबी मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. एकंदरीत आदर्श गाव हिवरेबाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार तसेच सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन पंकज कडू पाटील यांनी पंचक्रोशीत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहे.
याप्रसंगी विद्यालयातील गुरुकुल प्रमुख विलास गभाले यांच्या स्वलिखित चुरगळलेली अक्षरं या कवितासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख वक्ते पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व अनेक उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितले. यानंतर रयत सेवक संघाचे मा.सचिव भाऊसाहेब पेटकर यांनी अक्षर मानव वाचनालयातर्फे राबवले जाणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले.
वाचन उपक्रम उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब ताजणे, प्रमुख उपस्थितीत पंकज पाटील कडू, सूर्यकांत शिंदे, बाळासाहेब शेजवळ, सेवानिवृत्त पर्यवेक्षक पोपटराव पवार, रयत सेवक संघाचे माजी सचिव भाऊसाहेब पेटकर, प्राचार्य अशोक वानखेडे पर्यवेक्षक सिताराम बिडगर सेवकवृंद समवेत विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सिराज मन्सुरी यांनी केले.तर गुरुकुलप्रमुख विलास गभाले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले..