अहिल्यानगर
नगरपालिकेचा कचर्यातून खतनिर्मिती प्रकल्प यशस्वी – खा. तनपुरे
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी शहरातील जमा होणाऱ्या कचर्यातून कंपोस्ट खताची निर्मिती हे महत्त्वाचे पाऊल ठरले असून पालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे हा प्रकल्प अधिक उत्तुंग भरारी घेईल. गेल्या वीस वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्णत्वास जात असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
पालिकेने उभारलेला घनकचरा प्रकल्प व त्यातून खत निर्मिती करण्याचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल कासार होते. तनपुरे म्हणाले की पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. गेल्या वीस वर्षांपूर्वी शहरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या कचऱ्यातून खत निर्मिती होऊ शकते अशी कल्पना पुढे आली. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर सुमारे 25 एकर जागा उपलब्ध झाली. त्या जागेत अद्यावत मशनरी आणून शेती उपयुक्त कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात झाली. कंपोस्ट डेपो उभारून ओला व सुका कचर्याचे विलगीकरण करून मशनरी द्वारे खत प्रकल्प यशस्वी झाला. प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर रस्ता बांधण्यासाठी करावा लागणार आहे. दर्जेदार सेंद्रिय खत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. टाकाऊपासून उपयोगी खत निर्मिती करण्यावर भर देण्यात आला. कचरा डेपोच्या परिसरात सुमारे दोन हजार झाडे लावण्यात आली. पाच एकर जागेत सौर उर्जेवर वीज निर्मिती करण्याचा मानस असून त्या वीज निर्मितीतून शहराला पालिकेचा होणारा विद्युत पुरवठा केला जाणार असल्याने पालिकेचा विद्युत खर्च वाचणार आहे. परिसरात लावण्यात आलेली झाडी याचा पर्यावरणाला मोठा हातभार लागणार आहे. पशुपक्ष्यांना त्याचा उपयोग होणार आहे. कचर्याचा वापर कसा करायचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यास आता मूर्त स्वरूप आले आहे. कचरा डेपोचा कोणताही त्रास शहरवासीयांना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली. कचरा डेपोला आग लागली तर लगेचच विझविण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. भविष्यकाळाचा वेध घेत नगरपालिकेने चांगले कार्य केले असून विविध उपक्रम यशस्वी झाले असल्याचे श्री तनपुरे यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष अनिल कासार म्हणाले की शहरातील नागरिकांनी जमा होणारा कचरा घंटागाडीत टाकून सहकार्य केले आहे. यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी सचिन बांगर म्हणाले की शहरात जवळपास 15 टन कचरा जमा होतो. त्यातील नऊ टन ओला तर सहा टन सुका कचरा जमा होतो. कचरा डेपोवर आल्यानंतर त्याचे विलीनीकरण करून विविध प्रक्रिया होत कंपोस्ट खत तयार केले जात आहे. कचऱ्यावर 100% प्रक्रिया होऊन घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला. आणखी मशनरी आणून अधिक सुसूत्रता येणार आहे. सेंद्रिय खताची 50 किलो ची पिशवी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. विस्तीर्ण जागेत हा प्रकल्प असल्याने जमा झालेला कचरा विल्हेवाट लागत आहे. या प्रकल्पाविषयी त्यांनी सविस्तर माहिती सादर केली.
यावेळी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, विलास तनपुरे, बांधकाम विभागाचे अभियंता स्वप्निल काकड, विद्युत व उद्यान विभागाचे शंकर आगलावे, आरोग्य विभागाचे राजेंद्र पवार, नोडल अधिकारी सुभाष बाचकर व कर्मचारी उपस्थित होते.