अहिल्यानगर
स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत सन्मान नारी शक्तीचा सोहळा संपन्न…!
संगमनेर/ बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत आज शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या आजच्या नवदुर्गांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
गेली अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संकटात पेमगिरीतील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका या महिलांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन वाड्यावस्त्यांवरील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजन लेवल चेक करून, लसीकरण, नागरीकांमध्ये जनजागृती केली व वेळोवेळी सर्वे करून या संकटात आपलं प्रामाणिक कर्तव्य पार पाडले आहे. छत्रपती शिवरायांनीही ज्याप्रमाणे रायगडावर हिरकणीच्या मातृत्वाच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान केला होता. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन या महिलांना सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे पुढील कार्य करण्यासाठी आणखी ऊर्जा आम्हाला नक्कीच मिळेल असं मनोगत या महिलांनी व्यक्त केलं. शहागड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात व इथून पुढेही नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. या कार्यक्रम प्रसंगी पेमगिरीच्या विद्यमान सरपंच सौ.द्वारकाताई डुबे, कामगार तलाठी सौ.सुरेखा कानवडे, कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मिलिंद टपाल, ग्रा.प.सदस्य सन्मा.जनार्धन कोल्हे, डॉ.सतीश देवगिरे, विष्णु डुबे, शहागड युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.