अहिल्यानगर
शिरसगाव येथे विजयादशमी उत्साहात
श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील शिरसगाव येथे नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. घटस्थापना दिनी शिरसगाव येथे प्रवेशव्दाराजवळ तीस ते चाळीस शिरसगाव युवकांनी श्री क्षेत्र देवस्थान वणी येथून आणलेल्या मशाल ज्योतीचे सकाळी जंगी स्वागत करण्यात आले. त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, महिला, देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागोजागी पूजन, पाण्याचा सडा टाकण्यात आला होता. ही मशाल ज्योत ज्यावेळी गावाच्या शिवेजवळ आली त्यावेळी मशाल ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
आज विजयादशमी दिनी सप्तशृंगी देवी असलेल्या प्रतिमेची पालखीतून मंदिरापासून कोरोनाचे नियम पाळून मिरवणूक सवाद्य काढण्यात आली. मंडळाच्या भक्तांनी वेगळा गणवेश परिधान केला होता. महिला व भाविकांनी सप्तशृंगी देवीचे पालखीत दर्शन घेतले व पूजन केले. शिरसगाव महादेव मंदिरात ग्रामस्थ, मान्यवरांनी पूजन केले. गावातून, वेशीतून मिरवणूक फेरी झाल्यावर मंदिरात सांगता झाली. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोषात विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला.