अहिल्यानगर
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरी-तिसगाव, बुर्हानगर व इतर गावे पाणी पुरवठा सुरू करण्याचे दिले निर्देश
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : पाथर्डी तालुक्यातील मिरी–तिसगांव पाणी योजना व बु-हानगर व इतर गावे पाणी योजना थकीत विज बिलाअभावी योजना बंद होती. सदर योजना चालू करण्यासाठी आज नगर येथे शासकीय विश्रामगृहावर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मिरी तिसगांव व बु-हानगर इतर गावे प्रादेशिक पाणी योजनेच्या थकीत विज बिलाबाबत चर्चा करण्यात आली. थकीत विजबिला पैकी काही रक्कम त्वरीत भरावी असे योजनेचे सचिव तथा गटविकास अधिकारी यांना सुचना करुन महावितरणच्या अधिका-यांना दोन्ही योजनेचा खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्याचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले.
यावेळी मिरी–तिसगांव पाणी योजनेचा जलजीवन मिशन मध्ये समावेश करण्याविषयी चर्चा झाली. पाथर्डीचे गटविकास अधिकारी, मिरी तिसगांव योजनेचे सचिव, संबधीत गावातील सरंपच, नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बु-हानगर योजनेचे सचिव, जि.प.सदस्य शरद झोडगे, काशिनाथ लवांडे, रोहिदास कर्डीले, रघुनाथ झिने, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके आदि उपस्थीत होते.
बु-हानगर व इतर योजनेतील नागरदेवळे येथे पाणी पुरवठा योजनेची प्रत्यक्ष पहाणी करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या. त्वरीत कार्यवाही न झाल्यास संबधीत ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री तनपुरे यांनी दिले. तसेच मिरी- तिसगांव व बु-हानगर पाणी योजना त्वरीत सुरु करण्याचे निर्देश महावितरण अधिकारी यांनाही मंत्री तनपुरे यांनी दिले.