अहिल्यानगर
पुस्तके हे आमुचा श्वास आहेत – प्रा. डॉ. नवनाथ शिंदे
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : पुस्तक समाजाचं मस्तक असतं, पुस्तक कधीही कुणाचं हस्तक नसतं. जो पुस्तकापुढे नतमस्तक होतो, समाज त्याच्यापुढे नतमस्तक होतो. पुस्तक माणसाचे मन निर्मळ करणारा साबण आहे. बोलावे मोजके आणि वाचावे नेमके, या उक्तीप्रमाणे वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. “प्रबंधही आमुचे श्र्वास होवेत” या संत ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे वर्तमानकाळात पुस्तके हे आमचे श्वास आहेत, असे मत प्रतिपादन सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नवनाथ अंगद शिंदे यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वाचन ‘प्रेरणा दिन’ समारंभात डॉ. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब सलालकर, डॉ. रामदास बोरसे, डॉ. भाऊसाहेब नवले, प्रा. एकनाथ निर्मळ, प्रा. आदिनाथ दरंदले, कार्यालयीन अधीक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘माझा वाचनानुभव’ या विषयी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. नवनाथ शिंदे पुढे म्हणाले,” खरे तर वाचनानुभव हा अमृतानुभव असतो. आपण अनेक भौतिक वस्तू खरेदी करतो परंतु पुस्तके खरेदी करताना कोणी दिसत नाही. मित्रहो! ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक व्याज देते. पुस्तके सुद्धा चांगले मित्र असतात. पुस्तकांच्या सहवासात आपण सर्वाधिक सुरक्षित असतो. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले, “ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ग्रंथालयातील पुस्तके तासनतास वाचली पाहिजेत. ग्रंथालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी ई-रिसोर्सचा अभ्यास करावा. महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये विविध विषयाच्या संदर्भातील पुस्तके असून विद्यार्थ्यांनी फुरसतीच्या वेळचा उपयोग अवांतर वाचनासाठी करावा.
याप्रसंगी ग्रंथालय परिचारक श्री. सुखदेव पवार तसेच कु. दिपाली राजेंद्र भुसारी, दिव्या राजेंद्र शिंदे, ऋत्विका अविनाश ताठे, तृप्ती सिनारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. आदिनाथ दरंदले यांनी केले. ग्रंथालय समितीचे चेअरमन प्रा. एकनाथ निर्मळ यांनी आभार मानले.