प्रासंगिक
लाचार बनून संपायचे कि, बंडखोर बनत आपली ओळख निर्माण करायची- दत्तात्रय कडू पाटील
नेतृत्व करायला कुणाला आवडत नाही. नेतृत्व म्हटलं कि त्याचे पाठीराखे व समर्थक हे ओघाने आले. कधीकधी प्रश्नांतुन नेतृत्व तयार होते. तर कधी नेतृत्व प्रश्न तयार करत असते. शून्यातून निर्माण होत अतीविशाल होत जातात काहीजण. तर काही मुळातच विशाल पृष्ठभुमी लाभलेले असतात. त्यांना फार वेगळे काही करायची गरज नसते. कधीकधी ते समर्थपणे वारसा पुढे नेतात. तर काहीजण तो वारसा मोडीत काढत आपली ओळख निर्माण करतात. हि ओळख काहिंना पटते तर काहींना खुपते. ज्या उद्देश्यासाठी संघटना निर्माण होते. तो उद्देश्य शुध्द असेल न् नेतृत्व त्याचेशी प्रामाणिक राहिले तर संघटना पुढे जाते.
एका रंगाचे पक्षी एकत्र उडत असतात. याचा अर्थ एका विचारधारेची माणसे त्या विचारधारेच्या सुत्राने बांधली जातात. यात समर्पणाची भावना महत्वाची, मला संघटनेने काय दिले यापेक्षा मी संघटनेला काय दिले हे जे नेतृत्व न समर्थक जाणत असतात. ती संघटना जास्त टिकत असते. मुळात तुमच्या वैयक्तीक गरजा वा कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच वैयक्तीक स्वार्थासाठी संघटना असत नाही. यापलिकडे व्यापक हित संघटनेच्या जडणघडणीत असते. संघटना हे असे दुधारी शस्र आहे. जे समाजात एका बाजुला तुरटीचे काम करत समाजातील दोष, अन्याय दुर करत असतात. दुस-या बाजुला विध्वंसक, द्वेष पेरण्याचे काम काही घटक करत असतात. शोषीतांना वा गुलांमाना खरे तर संघटित होणे गरजेचे असते. त्यांचे प्रश्नावर चळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत. काल शेतकरी नेते राजु शेट्टींचे एक वाक्य अंर्तमुख करुन गेले. कधीकाळी चळवळीचा असलेला नगर जिल्ह्यात लाचारांच्या फौजा निर्माण झाल्या आहेत, विचार करावा असे त्यांचे निरिक्षण आहे.
सर्वसामान्यांच्या भौतीक गरजा अन्न, वस्र , निवारा यापलिकडे जावुन शिक्षण, आरोग्य , रोजगार न् निर्भय वातावरण या ठिकाणी येवुन थांबले आहे. जेंव्हा तुम्ही या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी धडपडत असता तेव्हा तुमची असहाय्यता निर्माण होत असते. हि असहाय्यता तुम्हांला लाचार बनवत असते. मुळात संविधानाने हे वरिल सर्व बाबी मुलभुत मानुन त्या प्रत्येकालाच मिळाल्या पाहिजेत असे स्पष्ट बजावले आहे. परंतु या सर्व गोष्टी नकळत वा सहज प्रस्थापिंत व्यवस्थेने स्वत:चे ताब्यात घेतल्या आहेत. शिक्षणसंस्था, कृषी उद्योग, आरोग्य व्यवस्था पुर्ण खासगी व्यवस्थेच्या हातात गेली आहे. सरकारची मर्यादा आपण लक्षात घेतली तरी या प्रस्थापित व्यवस्थेने विकास व प्रगती केली असेल. परंतु ती सुज आहे. सर्वसामान्य मानाने नाहीतर लाचार होत या व्यवस्थेशी जुळवुन घेत असतो.
मानी न् स्वाभिमानी वा विरोध करण्याला या व्यवस्था एक तर वेडे ठरवतात अथवा थारा देत नाही. एक गोष्ट महत्वाची आहे तुमचा पाठीचा कणा न् मनातील स्वाभिमानाचा अंगार कधीहि झुकु वा विझु दिला नाही पाहिजे. या प्रस्थापित व्यवस्थेला तुमची लाचारी व मौन एक प्रकारे बळकट करत असते. तुमच्यातील गुलामी व लाचारी बाहेर काढली तर तुम्ही माणुस म्हणुन जगलात असे समजायचे. कोणताहि मनुष्य कनिष्ठ व गौण नाही. तो त्याच्या गुणवैशिष्ट्याने श्रेष्ठ असतो. फक्त त्याला त्याची जाणीव करुन द्यायची असते. ते काम नेतृत्व संघटना करत असतात. यात संघटना वा नेतृत्वाची पत महत्वाची नसते. तो सर्वसामान्यांची किती पत वाढवतो यावर त्याची लोकप्रियता अवलंबुन असते. लाचारांचे नेतृत्व करणारे हुकुमशहा असतात. येथे कोणत्याही व्यक्तीमत्वाची वाढ होत नाही. याउलट स्वाभिमानी चार मावळे सोबत घेत बांधिलेली संघटना गुलामांना त्याचे हक्काची जाणीव करुन देत बंडखोर बनवतात.
दत्तात्रय कडू पाटील
देवळाली प्रवरा हेल्प टीम