अहिल्यानगर
राज्यातील आदिवासी आश्रम शाळा लवकरच अत्याधुनिक सुविधायुक्त होणार : ना. तनपुरे; पिंप्री-वळणमध्ये आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वाटप
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सुमारे १०० आदिवासी आश्रम शाळा लवकरच अत्याधुनिक करण्याचा माणस आहे. त्यासाठी केंद्राकडे निधीचीही मागणी केली आहे. ज्या शाळेत उद्योगपतींचे मुले शिक्षण घेतात त्याच पटीत माझ्या आदिवासी बांधवाच्या मुलांना देखील उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील पिंप्री-वळण, चंडकापुर येथे आदिवासी बांधवांना आदिवासी विभागाच्या माध्यमातून मोफत घरपोहच जातीच्या दाखल्याचे वितरण ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवारी सकाळी पिंप्री येथील खंडोबा मंदिरासमोर सुमारे ८५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. ना.तनपुरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये आदिवासी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्याने या विभागाचे राज्यमंत्री पद मागुन घेतले. त्यामाध्यमातुन असे समोर आले की, योजनांचा लाभ या बांधवांना केवळ जातीचा दाखला नसल्याने मिळत नसल्याचे लक्षात आले. म्हणून ह्या विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्वे करून प्राधान्याने जातीचे दाखले मिळवून देत आहोत. आता विषेशतः विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन या दाखल्याच्या आधारे नोकरीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राहुरी मतदार संघामधील आदिवासी बांधवांना विषेध तत्वाने वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पाठपुरावा या माध्यमातून केला जाणार आहे. पिंप्री -वळण येथील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेसाठी जागेची येणारी अडचण लक्षात घेता शासन स्तरावर ह्या अडचणी सोडविण्यासाठी अधिका-यांना मंञी तनपुरे यांनी योग्य त्या सुचना यावेळी केल्या आल्या आहेत.
प्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र आढाव, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे, मा.सरपंच ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट, युवराज पवार, यशपाल पवार, वैभव जरे, शिवाजी जाधव, अरूण खिलारी, बाळासाहेब शिंदे, मुकींदा काळे, प्रकाश आढाव, जालिंदर कानडे, विलास पुंड, दादासाहेब राजळे, बाबासाहेब डमाळे, दगडू साळवे, भगवान कानडे, आबासाहेब लहारे, शिवाजी डमाळे, रविंद्र गरूड, विष्णु पवार, शिवाजी जाधव, आप्पासाहेब गोलवड, जगन्नाथ जाधव, लखन कानडे, भागवत आगलावे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.