अहिल्यानगर
मराठा महिला समितीच्या वतीने दुर्गापूजन, दांडिया नृत्य उत्साहात
श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : येथील मराठा समाज बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान अंतर्गत मराठा महिला समिती श्रीरामपूर यांच्या वतीने नवरात्र उत्सव सोहळा सुरु असून श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या समवेत आज रविवारी नवरात्री निमित्त दुर्गापूजन, जोगवा, भोंडला, दांडिया नृत्याचा आदी कार्यक्रम शिवबा हॉल थत्ते ग्राउंड श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडले.
प्रारंभी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते दुर्गापूजन व आरती घेण्यात आली. त्यानंतर श्री साई संस्थान शिर्डी येथे एकमेव महिला विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल मराठा महिला समितिच्या वतीने सौ सीमाताई जाधव यांच्या हस्ते समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी उत्सवास शुभेच्छा दिल्या व आयोजित जोगवा, भोंडला, दांडिया कार्यक्रमात सर्व महिला समवेत त्यांनी स्वत: सहभागी होऊन नवरात्री उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी प्रास्तविक करताना सीमाताई जाधव यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीप्रमाणे जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते जतन केले पाहिजेत. पूर्वी महिलांना घराबाहेर पडता येत नव्हते. आज महिलांना एकत्र करून त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या उद्देशाने व एकमेकींच्या भेटीगाठी होऊन उत्सव साजरा केला पाहिजे. यामुळे महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेत आहोत.
या सोहळ्यात मराठा महिला समितीच्या सीमा जाधव, जयश्री नवले, ज्या जगताप, डॉ वैशाली कापसे, वृषाली आढाव, निशा थोरात, सुरेखा आभाळे, स्वाती बारहाते, पल्लवी बंगाळ, मंगल निकम, छाया चोथे, रोहिणी, उषा, स्मिता व्यवहारे, लतिका गागरे, सविता मोरगे आदींनी सहभागी होऊन आनंद घेतला. सूत्र संचालन सीमाताई जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन मयुरी निंबाळकर यांनी केले.