अहिल्यानगर
राहुरी कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी पदवीस ए.आय.सी.टी.ई. ची मान्यता
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि अभियांत्रिकी ह्या पदवीस ए.आय.सी.टी.ई. ची मान्यता मिळाली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ भारतातील तिसरे कृषि विद्यापीठ आहे की ज्यांच्याद्वारे सुरु असलेल्या कृषि अभियांत्रिकीच्या पदवीस ए.आय.सी.टी.ई. ने मान्यता दिली आहे. या पूर्वी पंतनगर व उदयपूर या विद्यापीठाद्वारे सुरु असलेल्या कृषि अभियांत्रिकीच्या पदवीस ए.आय.सी.टी.ई. ने मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे कृषि अभियांत्रिकी पदवीधर हे इतर अभियांत्रिकी पदवीधारकांप्रमाणे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतील. तसेच महाविद्यालयास भारत सरकारच्या तंत्रज्ञान शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत लाभ मिळेल.
सदर मान्यतेसाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन नलावडे तसेच सर्व सदस्य व महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी.जी. पाटील यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून आवश्यक ते प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पारित केली. संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे व विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.