गुन्हे वार्ता

ढोरकीन शिवारातील शेतमजुर खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपी जेरबंद

   
पैठण एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

विलास लाटे/पैठण : ढोरकीन शिवारातील शेतवस्तीवर मागील महिन्यातील दि.११ सप्टेंबर रोजी शेतमजुराचा खून करून फरार असलेल्या मुख्य आरोपीस पैठण एमआयडीसी पोलीसांनी राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथून शुक्रवार (दि.८) रोजी अटक करण्यात आली आहे. सोन्या मन्सीराम चव्हाण (वय ४०) रा. टाकळी, पारधी वस्ती ता.पैठण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पैठण तालुक्यातील ढोरकीन दिन्नापुर रस्त्यावरील किरण पेरकर यांच्या आखाड्यावर शेतीची देखभाल करण्यासाठी शेतमजूर म्हणून संदीप साळवे हा कामाला होता. दरम्यान दि.११ सप्टेंबरच्या रात्री या आखाड्यावर कोंबड्या चोरण्यास आलेल्या चोरट्यांना संदीपने रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना त्या रात्री घडली होती. या अगोदर याप्रकरणातील संजय मचांराम चव्हाण व मुकेश उर्फ बाळू मंचांराम चव्हाण या दोन आरोपींना पैठण एमआयडीसी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने अवघ्या पाच दिवसांतच आरोपींचा छडा लावून अटक केली होती. मात्र या गुन्ह्यातील फरार असलेला मुख्य आरोपी सोन्या चव्हाण हा जवळपास एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्यास पैठण एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने, वेषांतर करून राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील पारधी वस्तीवरुन ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, सहाय्यक फौजदार दिलीप मगरे, राम मारकळ, राजेश चव्हाण, गणेश खंडागळे, करतारसिंग सिंघल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button