अहिल्यानगर
शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करा- श्री संत सावता माळी युवक संघाची मागणी
वांबोरी प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने एकरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करून बळीराजाच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावे, या मागणीचे निवेदन श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची दाणादाण उडवली असून हाताशी आलेलं पीक अति पावसामुळे वाया गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक चिंता अधिक वाढली आहे. मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी आजही शेतातील पिकांमध्ये पाणी आहे. त्यात पाऊस थांबयाचा नाव घेईना, असे असताना पिकांची सोगंणी कशी करायची. परतीचा पाऊस अजूनही पडेल असा अंदाज वर्तवण्यात आल्याने सोयाबीन, कपाशी, मका व भाजीपाला पिकांना जास्त फटका बसला आहे. यामुळे बळीराजा आर्थिक हतबल झाला आहे. मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके आडवी झाली आहेत. सणासुदीच्या काळात बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून आता पिक कर्ज कसे फेडायचे असा प्रश्नही बळीराजा पुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून एकरी २५ हजार रुपये देण्यात यावी.
या निवेदनावर संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, राज्याचे मीडिया प्रमुख दिपक साखरे, पारनेर तालुका अध्यक्ष नितीन परंडवाल, शहराध्यक्ष सुनील शिंदे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे, डॉ. सुदर्शन गोरे आदींच्या सह्या आहे.