ठळक बातम्या
नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आगीचे तांडव…
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : नगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी ११ च्या दरम्यान घडला आहे. आगीच्या या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र आगीची तिव्रता लक्षात घेता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही रुग्ण भाजल्याचे देखील वृत्त आहे. आगीची दाहकता भयावह होती मात्र आता ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र तेथील नागरिकांशी संवाद साधला असताना ही आग गॅसच्या लीकेजमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाकडून याबद्दल अद्याप काही सांगण्यात आलेले नाही. मात्र शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांचा तसेच फायर ऑडिटचा गलथान कारभार यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वॉर्डच्या अक्षरश: खिडक्या तोडून ही आग विझवण्यात आली मात्र आतील वस्तूंचा कोळसा झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर नागरिक संतापले होते. हॉस्पिटल आवारातच प्रशासनाविरोधात निषेधाच्या घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.
आयसीयू विभागाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरसेवक निखिल वारे, अभिषेक कळमकर आणि बाळासाहेब बोराटे आदी लोकप्रतिनिधींनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे.
अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. दरम्यान रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. आयसीयू विभागात ऑक्सिजनच्या लीकेजमुळे किरकोळ स्वरूपाची आग मोठे स्वरूप अवघ्या काही मिनिटात धारण करते त्यामुळे हा प्रकार झाला असल्याची दाट शक्यता आहे.
आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की,“अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 रूग्णांपैकी 7 रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे.
सहा पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू :रामकिसन हरगुडे, सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्वनाथ जडगुळे आणि एक अनोळखी पुरुष