कृषी
पाडेगाव येथे ऊस बेणे विक्रीचा शुभारंभ
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभुत ऊस बेणे विक्रीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ऊसामध्ये एकरी 168 टन उत्पादन घेणार्या संजीव माने व अशोक खोत या प्रगतशील शेतकर्यांच्या हस्ते बेणे वाटपाला सुरुवात झाली.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते पाटील व विधानपरिषद सदस्य आमदार रणजिंतसिंह मोहिते पाटील यांनी पाडेगावच्या प्रक्षेत्रावरील ऊस बेणे मळयास भेट देऊन संशोधन उपलब्धीची माहिती घेतली. यावेळी ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांनी त्यांचे स्वागत केले.
पाडेगाव संशोधन केंद्राने 15.35 हेक्टर क्षेत्रावर ऊसाच्या मुलभुत बेणे घेतले असुन या बेणेची लागवड डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत करण्यात आलेली आहे. यामध्ये को-86032 हे वाण 8.05 हेक्टर क्षेत्रावर तर फुले-265 3.90 हेक्टर, फुले-10001 2.30 हेक्टर आणि फुले 09057 1.10 हेक्टर बेणे क्षेत्राचा समावेश आहे. एकुण एक कोटी दोन डोळा टिपरी बेणे विक्रीस उपलब्ध होणार आहे. हे बेणे 1000 एकरासाठी पुरणारे आहे. एक गुंठा लागवडीसाठी दोन डोळ्याची 250 टिपरी लागतात. त्याच्या माध्यमातुन पुढीलवर्षी 1250 ऊस तयार होतील व दोन डोळ्याची 25000 टिपरी उपलब्ध होईल. अशाप्रकारे एक गुंठे प्लॉटमधुन एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येईल. एक कोटी बेण्याच्या माध्यमातुन पुढीलवर्षी चार लाख हेक्टर क्षेत्रावर बेणे लावता येईल. बेणे ऊसाच्या दोन डोळ्याच्या एक हजार टिपरीचा तोडणी आणि भरणीसह विक्रीचा दर रु. 1550/- असा आहे.
या केंद्रातुन बेणे घेण्यासाठी बेणे विक्री अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे मो.नं. 8275473191 व डॉ. दत्तात्रय थोरवे मो.नं. 9881644573 यांचेशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत संपर्क साधावा. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र शेतकरी आणि साखर कारखाने यांचे विकासाकरीता सतत प्रयत्नशील आहे. या संशोधन केंद्राने तयार केलेल्या को-86032, फुले-265, फुले-10001 आणि फुले -09057 या ऊस वाणांच्या बेण्याचा सर्व शेतकर्यांनी नविन लागवडीसाठी उपयोग करावा असे आवाहन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.