अहिल्यानगर
मानोरी येथील रेणुका मातेचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार : ट्रस्ट अध्यक्ष आढाव
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : लाखो भाविकांच्या नवसाला पावणारी राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रेणुका माता भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सव मागील वर्षीप्रमाणे यंदा पुन्हा करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब आढाव यांनी दिली आहे. राज्य शासनाने दि.७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याच बरोबर करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापन कमिटीच्या बैठकीत नियमावली जाहीर केली आहे.
घटस्थापनेपासून नवरात्र उत्सव काळात धार्मिक कथा, किर्तन, प्रवचन, घटी बसणाऱ्या महिला तसेच मंदिर परिसरात प्रसाद, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ आणि खेळणीची दुकाने लावण्यास प्रतिबंध असणार आहेत. विनामास्क व सोशल डिस्टन्स ठेवूनच भाविकांना रांगेत दर्शन घेणे बंधनकारक केले आहे. मंदिरात विधिवत पुजा करून घटस्थापना, अभिषेक व आरती अशा स्वरूपात महोत्सव नियमितपणे सुरु असणार असल्याचे रेणुका माता भगवती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब आढाव, सचिव उत्तम खुळे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, कचरू आढाव, निवृत्ती आढाव, पोलीस पाटील भाऊराव आढाव या विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवरात्र उत्सव काळात राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना प्रसार रोखण्यासाठी घटस्थापनेपासून नवरात्र उत्सव काळात सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे._ नानासाहेब आढावअध्यक्ष, रेणुका माता भगवती देवस्थान ट्रस्ट मानोरी.