तलाठ्यांचा कारभार चालतो त्यांच्या सोईनुसार…
◾पैठण तालुक्यातील पाचोड मंडळातील धक्कादायक प्रकार
विजय चिडे/पाचोड : कुठेही गेले तरी शेती आणि शेतकरी यांना तलाठी कार्यालयाच्या उंबरठ्यावर गेल्याशिवाय पर्याय नसतो. आता सरकारने महसूलचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी एक पोर्टल सुरू केले आहे. तरीही तलाठी आणि मंडळधिकारी अजूनही सोयीनुसार आणि तडजोडीतल्या नोंदी मंजूर करण्याला पहिले प्राधान्य देत आहेत.
सामान्य शेतकर्यांना आपल्या फेरफारीच्या नोंदी मंजूर करण्यासाठी तालुक्यातील पाचोड मंडळ कार्यालय तसेच मुरमा, थेरगाव, लिंबगाव, आडगाव, आंतरवाली खांडी, दादेगाव खु.बु, हर्षी खू.बु, रांजगाव दांडगा, एकतूनी सह तलाठी कार्यालयांचे उंबरठे परिसरातील शेतकऱ्यांना झिजवावे लागत असल्याचे पाहावयास मिळत आहेत.‘जे नसे ललाटी ते लिखे तलाठी’ अशी ग्रामीण भागात मराठी म्हण आहे. याची प्रचिती सध्या पैठण तालुक्यातील पाचोड महसुल मंडळातील शेतकर्यांना येत आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना सातबाराच्या सह्यासाठी तासनतास बसावे लागत आहे. अन्य दाखले तर मिळतच नाहीत. कुणाचे काम वेळेवर होत नाही. ज्याची ओळख आहे, त्याचेच काम होत आहे. यापुढे जाऊन तलाठी आणि मंडळाधिकारी शेतकर्यांनी केलेले खरेदी विक्रीच्या दस्ताची, गहाण खताची फेरफार नोंद करताना कुणाच्या नोंदी वेळेवर होतील याचा भरोसा राहिला नाही. ज्यांची ओळख आहे, त्यांचे फेरफार मंजूर केले जात आहेत. तर ज्याची ओळख नाही त्यांचे फेरफार मंजूरच केले जात नाहीत. अनेक फेरफार मंजूर करताना या बाबतीत आलेल्या हरकतींचा विचार न करताच नोंदी मंजूर केल्या जात असल्याचे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहेत.
त्या पोर्टलवर टाकलेल्या फेरफार नोंदी पाहिल्या तर मागील एकवर अशाच प्रकारे गावदप्तरी नोंदी करताना तलाठी आणि मंडळधिकारी कुठल्याच प्रकारे पाहणी न करता ज्याची ओळख असेल त्याचे काम अगोदर करत आहेत. जो अगोदर दाम देईल त्यांचे काम लगेच केले जात आहेत. पूर्वीच्या अनेक नोंदी रखडल्या आहेत; मात्र नंतरच्या नोंदी गाव दप्तरात केल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी दुरध्वनी स्विकारला नसल्यामुळे या विषयावर त्यांची प्रतिक्रिया भेटू शकली नाही.