अहिल्यानगर

रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवा; जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे मागणी

राहुरी/ मधुकर म्हसे : नगर तालुक्यातील पिंपळगांव-माळवी तलावातील पाणी सांडव्यावरुन रहदारीच्या रस्त्यावरुन वाहत असल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना या पुलावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे या पाण्याला पाईपलाईन द्वारे मार्गस्थ करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने पिंपळगांव माळवी तलाव पुर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी हे रस्त्यावरुन वाहत असल्याने यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

या रस्त्यावरुन परिसरातील अनेक गावातील नागरिकांची ये-जा असते. पाणी वाढल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेव्हा या रस्त्यावरुन जाणार्‍या पाण्यास पाईपलाईनद्वारे मार्गस्थ करावे किंवा या ठिकाणी असलेल्या दगडी पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने श्री संत सावता माळी युवक संघटनेने केली आहे.

याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, डॉ.सुदर्शन गोरे, दिपक खेडकर, दिपक साखरे, गौरव विधाते आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button