अहिल्यानगर
राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हक्काचे विचारपीठ – प्रा.डॉ. नवले
चिंचोली / बाळकृष्ण भोसले : महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हणजे २४ सप्टेंबर १९६९ पासून महाविद्यालयीन युवकांसाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली. महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच स्वयंसेवकांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे महाविद्यालयीन युवकांसाठी हक्काचे विचारपीठ आहे, असे मत प्रतिपादन सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब नवनाथ नवले यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, डॉ. शिवाजी पंडित तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक व गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. नवले पुढे बोलताना म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात देशभरातील चाळीस हजार विद्यार्थ्यासह झाली होती. ती संख्या आज तीन लाखांच्या पुढे आहे. आनंदाची बाब म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना व समाज सेवेची भावना वाढीस लागते. तो समाजहिताचा प्रामुख्याने विचार करण्यास प्रवृत्त होतो. सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यास व्हायला लागते. याचा अर्थ असा की, राष्ट्रीय सेवा योजना ही लोकचळवळीच्या रूपाने पुढे येत आहे. युवक, समाज आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होण्याच्या दृष्टीने ही बाबा महत्त्वाची आहे. विकास साध्य करायचा असेल तर रासेयो मध्ये युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाविद्यालयात अध्ययन करत असताना राष्ट्रीय सेवा योजना किंवा राष्ट्रीय छात्र सेना यामध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबरच राष्ट्राचे हिताचेही कार्य या माध्यमातून होत असते. रासेयोतून ग्रामस्थ व स्वंयसेवकांच्या सहकार्याने जलसंधारण, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, पर्यावरण समतोल, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, रक्तगट तपासणी, पशुचिकित्सा, स्त्रीभूणहत्या अभियान, साक्षरता अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा, हगणदारीमुक्त गाव, मतदार जागृती, प्रौढसाक्षरता अभियान इ. विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांतून ग्रामीण परिसरामध्ये जाणीव जागृती करण्याचे कार्य रासेयोच्या शिबीरामधून केले जाते. यामधून स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय, मानतावाद, सेवावृत्ती या मूल्यांची रूजवन स्वंयसेवकामध्ये निर्माण होते एकूणच राष्ट्रीय सेवा योजनातून ग्रामीण विकास होण्यासाठी रासेयोचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे.
यावेळी एन.आर. डी. व एस. आर. डी. परेड पूर्वचाचणीसाठी जिल्हास्तरावर निवड होऊन विद्यापीठ पातळीवर सहभागी झालेल्या कु. अंकिता रमेश घोलप हिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित भडकवाड यांनी केले. आभार भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश कान्हे यांनी मानले.