अहिल्यानगर
श्रीरामपूर भूषण पुरस्काराने डॉ.उपाध्ये यांचा झालेला गौरव उचित आणि प्रेरणादायी : डॉ. शिवाजी काळे
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये हे 1967 पासून श्रीरामपूर शहराशी निगडित आहेत. बोरावके कॉलेजला ते 1978 पासून विद्यार्थी असतानाच गोविंदराव आदिक यांनी स्थापन केलेल्या साहित्य शिल्प च्या माध्यमातून त्यांनी साहित्य चळवळीला वाहून घेतले, त्यांची 40पुस्तके प्रकाशित आहेत, नगराध्यक्ष अनुराधा आदिक आणि नगरपालिकेतील सर्वांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांना श्रीरामपूर भूषण पुरस्काराने गौरविले हे आम्हाला प्रेरणादायी असल्याचे मत साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान कार्यालयात डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा साहित्य मित्रपरिवारांतर्फे सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे होते. प्रारंभी साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचे विशेष आभार मानून त्यांनी एका सेवाभावी साहित्यकाची दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी सौ. स्नेहलता कुलथे, सौ.मोहिनी काळे, सौ. श्रद्धा कुलथे यांनी डॉ.उपाध्ये यांना शुभेच्छा दिल्या. सौ. मंदाकिनी उपाध्ये आणि सौ. आरती उपाध्ये यांनी उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान केला. पत्रकार प्रकाश कुलथे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, नगरपालिकेचे कार्य लोककल्याणाचे आहे, श्रीरामपुरातील योग्य व्यक्तींची नगराध्यक्षा अनुराधा आदिक आणि नगरसेवकांनी नगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी दिनी दखल घेऊन योग्य सन्मान केला. डॉ. उपाध्ये यांनी पोरक्या अवस्थेत शिक्षण घेतले, त्यांनी नगरपालिकेच्या ग्रंथालयासाठी आपली सर्व पुस्तके आणि प्राचार्य सौ. मंगल पाटील लिखित पुस्तके कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपाल स्वातीताई पुरी यांना प्रदान केली. हा त्यांचा वाचन संस्कृती उपक्रमही त्यांच्या साहित्यप्रेमाची साक्ष देणारा असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतातून नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगरसेवक आणि साहित्य मित्रपरिवार तसेच माजी प्राचार्य शेळके, डॉ. रामकृष्ण जगताप संगीता फासाटे आदिंनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले. सौ.आरती उपाध्ये यांनी आभार मानले.