अहिल्यानगर
कर्मवीर विचारांच्या कार्याला समर्पित झालेल्या सेवाभावी महापुरुषामुळे आपले जीवन घडले : प्रा. डॉ. शंकरराव गागरे
श्रीरामपुर (बाबासाहेब चेडे ) : अहमदनगर जिल्ह्यातील शंकरराव काळेसाहेब, पी. बी. कडू पाटील, पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील, अड, रावसाहेब शिंदे, कर्मवीर दादा पाटील अशा कितीतरी ग्रामीण शिक्षण क्षेत्राला कर्मवीर विचारातून वाहून घेतलेल्या सेवाभावी महापुरुषामुळे आपले जीवन घडले आहे, आकाराला आले असल्याची भावना माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी व्यक्त केली.
येथील शेळके सेवाभावी मित्रपरिवार आणि भूमी फाऊंडेशनतर्फे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली आणि वाचन संस्कृती जपणे यानुसार ॲड रावसाहेब शिंदे लिखित “ध्यासपर्व ” परिसंवाद यावर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रदीर्घ विवेचन केले. तर कर्मवीर जयंतीचे महत्व या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे बोलत होते, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे होते. प्रारंभी कर्मवीर प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आठवणी सांगितल्या. संयोजक प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सांगितले की चर्चा माणसाला कार्यप्रवृत्त करते कर्मवीर जयंती आणि ध्यासपर्व आत्मचरित्रातून कर्मवीर विचारांची शिदोरी उपयुक्त ठरते म्हणून हा कार्यक्रम आयोजित केले असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात पत्रकार प्रकाश कुलथे यांनी कर्मवीरांच्या योगदानामुळे गोरगरिबांचे शिक्षण झाले, आज पैसा फेको आणि डिग्र्या घ्या, पैसा कमविणे, राजकारण करणे आणि संस्थानं उभे करून संपत्ती कमविणे हे कर्मवीरांचे ध्येय नव्हते तर दीनदीलत, आर्थिक दुबळ्यांना त्यांनी शिक्षण दिले म्हणूनच आता ऐसा कर्मवीर होणे नाही, संस्थेत त्यांनी राजकारण आणि राजकारणी कधी येऊ दिले नाहीत हे कर्मवीरांचे वेगळेपण आहे असे कुलथे यांनी सांगून जनता हायस्कुल व कॉलेज अनुभव सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर भूमी फाऊंडेशनचे सदस्य बाबासाहेब चेडे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.